लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक प्रयत्न करूनही रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यास जिल्हा प्रशासन अपयशी ठरत आहे. बुधवारी जिल्ह्याला केवळ १३३१ रेमडेसिविर मिळाले. दुसरीकडे जाणकारांचे म्हणणे आहे की, जिल्ह्यात दररोज ५ हजारावर इंजेक्शनची मागणी आहे.
सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्ह्याला दहा हजार इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. यानंतरही सोमवारी ४२१३ आणि मंगळवारी केवळ ७०० इंजेक्शन मिळाले. मंगळवारी मिळालेल्या इंजेक्शनचे वाटपही बुधवारीच करण्यात आले. बुधवारी जिल्ह्यतील १७१ कोविड रुग्णालयांना हे इंजेक्शन वितरित करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वाटपाची यादी वेबसाईटवर टाकण्यात आली आहे. या यादीमध्ये कोविड रुग्णालय, एकूण बेड वाटप करण्यात आलेल्या इंजेक्शनची संख्या आणि घाऊक विक्रेत्याचा समावेश आहे.
जिल्हाधिकाऱ्यानी रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत काढलेल्या लेखी आदेशानुसार या इंजेक्शनचे आता थेट रुग्णालयांना वाटप होणार आहे .त्यासाठी संबंधित रुग्णालयाने त्यांच्या लेटरहेडवर सही शिक्यानिशी प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करावेत. विक्रेत्यांनी त्याची खातरजमा करून इंजेक्शनचे सुयोग्य वितरण करावे .आणि रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण हे शासकीय दरानेच करणे गरजेचे आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयातर्फे नियुक्त भरारी पथकामार्फत आदेशानुसारच वाटप झाल्याची खातरजमा करण्यात येणार आहे .त्यामुळे या इंजेक्शनच्या काळाबाजाराला प्रतिबंध होऊन गरजू रुग्णांना त्याचा लाभ होईल.
अनेक रुग्णालये रुग्णाच्या नातेवाईकांना इंजेक्शन आणण्यास सांगत आहे. नातेवाईकांना भटकावे लागत आहेत. त्यामुळे काळाबाजारही वाढला आहे.