नागपूर : स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी महापालिकेचा २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात तब्बल १६५० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले असताना प्रत्यक्षात आर्थिक वर्षाच्या शेवटी मात्र उत्पन्नाची गाडी एक हजार कोटींच्या आतच थांबली. महापालिकेच्या तिजोरीत जेमतेम ९५० कोटी रुपयेच जमा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे एलबीटीला प्रखर विरोध झाल्यानंतरही एलबीटीपासून गृहीत धरलेल्या उत्पन्नाच्या आसपास वसुली झाली आहे. मंगळवारी आर्थिक वर्ष संपले. महापालिकेतही मार्च एंडिंगची लगबग दिसून आली. बँकांचे कामकाज, मध्येच आलेल्या सुट्या यामुळे उत्पन्नाची अचूक आकडेवारी यायला सात-आठ दिवस लागतील. गेल्यावर्षी महापालिकेला एलबीटीचा जबर फटका बसला होता. त्यामुळे महापालिकेचे एकूण उत्पन्न ८३० कोटींच्या आसपास झाले होते. यावर्षी यात १२० कोटींची वाट होण्याची शक्यता आहे. यावर्षी प्रशासन व पदाधिकाऱ्यांना मालमत्ता कर विभागाकडून जास्त उत्पन्नाची अपेक्षा होती. २५० कोटींचे लक्ष्य दिले होते. मात्र प्रत्यक्षात लक्ष्याच्या ८० टक्के म्हणजे २०० कोटी रुपये वसुली होण्याची चिन्हे आहेत. एलबीटीपासून ४२५ कोटींचे लक्ष्य निश्चित केले होते. या आकड्याच्या जवळपास उत्पन्न मिळण्याची अधिकाऱ्यांना आशा आहे. प्राप्ता माहितीनुसार ३० मार्चपर्यंत एलबीटी विभागाने ४१० कोटी (मुद्रांक शुल्कासह), मालमत्ता करापासून १८८ कोटी रुपयांची वसुली केली होती. ३१ मार्च रोजी लोक मोठ्या प्रमाणात कर भरतात, व्यापारीही आपले सर्व व्यवहार क्लिअर करतात त्यामुळे या एका दिवसात मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा महापालिकेला आहे. महापालिकेचे मुख्य वित्ता व लेखा अधिकारी मदन गाडगे यांनी सांगितले की, उत्पन्नाची अंतिम आकडेवारी येण्यास दहा दिवस लागतील. दोन दिवस बँकांचे कामकाज बंद आहे. त्यानंतर सणांच्या सुट्या आहेत. यामुळे काही दिवसांनीच खरे उत्पन्न कळेल. (प्रतिनिधी)
उत्पन्नाच्या टार्गेटपासून मनपा दूरच !
By admin | Published: April 01, 2015 2:29 AM