नागपूर : रेमडेसिविरचा वापर पूर्णपणे प्रभावी असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. मात्र, काही खासगी रुग्णालयांसह मनपा रुग्णालयातही सीटी स्कोअर ‘नॉर्मल’ असलेल्यांनाही हे इंजेक्शन दिले जात असल्याचे चित्र आहे. धक्कादायक म्हणजे, हे इंजेक्शन मूत्रपिंड व यकृतावर परिणाम करते. यामुळे रेमडेसिविर देण्यापूर्वी त्यासंदर्भातील रक्ताची चाचणी आवश्यक ठरते; परंतु चाचणी न करताच हे इंजेक्शन दिले जात असल्याचा व अतिरेक वापर होत असल्याचे प्रकार सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
रेमडेसिविर या इंजेक्शनचा कोरोना संसर्गाच्या उपचारपद्धतीमध्ये वापर करताना तो मध्यम स्वरूपाची (मॉडरेट) लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी करावा, असे महत्त्वाचे निर्देश वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने दिले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ‘सॉलिडॅरिटी ट्रॉयल’दरम्यान ‘रेमडेसिविर’ या इंजेक्शनचे परीक्षण केले. यात हे इंजेक्शन रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी आणि संसर्गाचे दिवस कमी करण्यास प्रभावी ठरत नसल्याचे म्हटले आहे; परंतु कोरोनावर ‘अॅण्टी व्हायरल’ इंजेक्शन नसल्याने उपचाराच्या प्रायोगिक पद्धतीनुसार हे इंजेक्शन देण्यात येत आहे. या इंजेक्शनच्या वापरासंदर्भात केंद्रीय औषध नियामक मंडळ व कोविड टास्क फोर्सने दिशानिर्देश दिले आहेत. मात्र, काही रुग्णालयांमध्ये या इंजेक्शनचा वापर सौम्य लक्षणे असतानाही व किडनी व लिव्हरच्या आजारासंदर्भातील रक्ताची चाचणी न करताच दिले जात असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत.
-ऑक्सिजनची पातळी घसरल्यास व न्यूमोनिया असल्यास इंजेक्शन महत्त्वाचे -डॉ. जोशी
‘एम्स’च्या औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी.पी. जोशी म्हणाले, कोविडबाधिताच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९४च्या खाली घसरल्यास व त्याला न्यूमोनिया असल्यास रेमडेसिविर इंजेक्शन देणे महत्त्वाचे ठरते. सीटीस्कॅनचा स्कोअर व या इंजेक्शनच्या वापराचा फारसा काही संबंध नाही. हे इंजेक्शन ‘लाइफ सेव्हिंग’ नाही. या इंजेक्शनचा कितपत फायदा होईल, हे सांगणे कठीण आहे. कोरोनावर ‘अॅण्टी व्हायरल’ औषध नसल्याने याचा उपचारात वापर होत आहे. रेमडेसिविर हे तसे ‘सेफ’ ड्रग आहे; परंतु त्याचा प्रभाव किडनी व लिव्हरवर होत असल्याने रुग्णाला यासंदर्भातील कुठला आजार तर नाही, याची तपासणी होणे गरजेचे आहे.
-रेमडेसिविरमुळे‘अॅक्युट रिस्पेक्टरी फेल्युअर’चा धोका -डॉ. मेश्राम
मेडिकलच्या श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम म्हणाले, रेमडेसिविरच्या सुरुवातीच्या संशोधनात असे आढळून आले की, रेमडेसिविरचे पाच इंजेक्शन घेतल्यास सुमारे १३ टक्के तर १० इंजेक्शन घेतल्यास सुमारे २६ टक्के ‘अॅक्युट रिस्पेक्टरी फेल्युअर’ होण्याचा धोका राहतो. यामुळे अनुभवी डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी करूनच हे इंजेक्शन दिले पाहिजे. मूत्रपिंडाचा विकार असलेल्या रुग्णांवर या इंजेक्शनचा सांभाळून वापर करायला हवा.
रेमडेसिविर देण्यापूर्वी मूत्रपिंड व यकृताची चाचणी आवश्यक -डॉ. अशोक अरबट
वरिष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट म्हणाले, रेमडेसिविर कोरोनाच्या सर्वच रुग्णांसाठी नाही. मध्यम व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना डॉक्टरांनी तपासल्यावरच रेमडेसिविर देता येते. देण्यापूर्वी रुग्णांच्या मूत्रपिंड व यकृताची स्थिती पाहण्यासाठी रक्ताची चाचणी करणे आवश्यक ठरते. फॅविपिरॅव्हीर औषधी देऊनही चार ते पाच दिवस ताप कमी होत नसेल तेव्हा डॉक्टर रुग्णाची स्थिती पाहून रेमडेसिविर देण्याचा निर्णय घेऊ शकतात. या शिवाय, सीटीस्कॅनचा स्कोअर जास्त असल्यास, श्वास घेणे कठीण झाले असल्यास, कोमॉर्बिडिटी असलेल्या रुग्णांना हे इंजेक्शन दिले जाऊ शकते.