लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - वेळेवर रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने अनेक कोरोनाबाधितांचे जीव जात आहेत. दुसरीकडे मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची मानसिकता असलेले नराधम मनमानी पद्धतीने रेमडेसिविरची विक्री करीत आहेत. सदर आणि पाचपावली पोलीस ठाण्यात पुन्हा रेमडेसिविरचा काळाबाजार आणि चोरी केल्याप्रकरणी नव्याने दोन गुन्हे दाखल झाले आहेत. सदर पोलिसांच्या कारवाईत शनिवारी एक एमआर आणि त्याचा गुंड साथीदार सापडला. तर, पाचपावलीत रुग्णालय प्रशासनाच्या सतर्कतेमुळे एक वाॅर्डबॉय रेमडेसिविर चोरून नेताना पकडला गेला.
सुनील (काल्पनिक नाव) याच्या नातेवाईकावर कोरोनाचे उपचार सुरू आहे. तीन दिवसापूर्वी डॉक्टरांनी त्याला रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी किमान दोन रेमडेसिविर तातडीने हवे असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याने बरीच पायपीट केली. त्यानंतर त्याचा मनीष विनोद जोशी (वय ३३, रा. कस्तुरीनगर, बेलतरोडी) याच्याशी संपर्क आला. ३१ हजारात एक याप्रमाणे दोन रेमडेसिविर विकत देण्याची तयारी जोशीने दाखविली. बरीच विनवणी करूनही तो किंमत कमी करायला तयार नव्हता. त्यामुळे सुनीलने ते विकत घेण्याची तयारी दाखविली अन् मनीषने सांगितल्याप्रमाणे शनिवारी दुपारी २ वाजता तो राजभवनच्या रिअर गेटजवळ पोहचला. त्याने सदर पोलिसांनाही ही माहिती दिली होती. त्यामुळे ठाणेदार संतोष बाकल यांनी सापळा लावला. ठरल्याप्रमाणे आरोपी मनीष त्याचा साथीदार गोपाल ग्यानीप्रसाद शर्मा (वय ३४, रा. जरीपटका) आणि कमलाकर ऊर्फ छोटू मोहताम(वय ३५, रा. मानेवाडा)सोबत तेथे पोहचला. सुनीलकडून त्याने ५७ हजार रुपये घेऊन त्याला दोन रेमडेसिविर देताच पोलिसांनी झडप घातली. मनीष आणि गोपालला पोलिसांनी अटक केली. काही अंतरावर असलेला त्यांचा साथीदार कमलाकर मोहताम पळून गेला. हवालदार विजय कडू यांच्या तक्रारीवरून एपीआय मोटे यांनी आरोपी मनीष आणि गोपाल तसेच कमलाकरविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून रोख ५७ हजार, दोन इंजेक्शन आणि दुचाकी असा एकूण १,३३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कमलाकरचा शोध घेतला जात आहे.
----
ॲडव्हान्स घेतला गुगल पेवरून
आरोपी मनीषने ॲडव्हन्स दिल्याशिवाय इंजेक्शन मिळणार नाही, असे म्हटले होते. सुनीलने गुगल पेवरून शुक्रवारी त्याला चार हजार रुपये ॲडव्हान्स दिला. त्यानंतर तो शनिवारी इंजेक्शन घेऊन आला. त्याच्यासोबत पकडला गेलेला गोपाल शर्मा हा कुख्यात गुंड असून, त्याच्यावर आठ ते दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.
----
व्यवस्थापकानेच पकडली वाॅर्डबॉयची चोरी
पाचपावलीच्या होप हॉस्पिटलमध्ये आरोपी आरिफ शेख रफीक शेख (वय २२, रा. शांतिनगर) हा शनिवारी सकाळी १० च्या सुमारास ड्युटी संपवून घरी निघाला. व्यवस्थापक अंकित अशोक केसरी (वय २७, रा. बालाजी कॉलनी, रनाळा) यांना संशय आल्याने त्यांनी आरिफची बॅग तपासली असता त्यात दोन रेमडेसिविर इंजेक्शन सापडले. त्यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी आरोपी आरिफविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
----