बावनकुळे : दोन लाख शेतकऱ्यांना लाभ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या निर्णयाचा नागपूर जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. हा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी व्यक्त केली आहे. कर्जमाफीत समावेश नसलेल्या नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान जमा करण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे अशा शेतकऱ्यांचे मध्यम मुदतीचे कर्ज माफ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शेतकरी कठीण परिस्थितीतून बाहेर पडतील. शेतकऱ्यांना विविध योजनाच्या माध्यमातून मदत मिळावी यासाठी सरकार सकारात्मक होते. सर्वाशी चर्चा करून कर्जमाफीचा निर्णय घेतला. यापूर्वी केंद्र सरकारने कर्जमाफी दिली होती. परंतु विदर्भासह नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फारसा लाभ मिळाला नव्हता. सोबतच शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये यासाठी शेतीतील गुंतवणूक वाढविण्यात येणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
शेतकऱ्यांना दिलासा
By admin | Published: June 25, 2017 2:37 AM