यदु जोशी
अनसूयाबाई काळे या तशा विस्मरणात गेलेल्या एका सुसंस्कृत, अभ्यासू राजकारणी महिलेचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे. त्या नागपूरच्या दोनवेळा खासदार होत्या. काँग्रेस पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्या आणि प्रखर गांधीवादी. १९५२ आणि १९५७ मध्ये त्या खासदार म्हणून निवडून गेल्या. त्यापूर्वी तत्कालीन सी. पी. अँड बेरार प्रांतात त्या विधानसभेवर नामनिर्देशित झाल्या होत्या आणि १९३७ मध्ये याच विधानसभेच्या उपाध्यक्ष होत्या.त्यांचे पती पुरुषोत्तम बाळकृष्ण काळे हे मूळचे नाशिक जिल्ह्यातले पण व्यवसायानिमित्त ते नागपुरात आले आणि इथेच त्यांनी प्रोव्हिन्शियल ऑटोमोबाइल कंपनीची स्थापना केली. त्या आधी बर्डी पिक्चर हाऊस (नंतरचे रिजंट टॉकीज) आणि रघुवीर थिएटर्स (नंतरचे नरसिंग टॉकीज) याचे ते भागीदार होते. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून त्यांनी इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. प्रत्येक घरातून एक स्वयंसेवक देशासाठी द्या, या महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुरुषोत्तम काळे हे स्वातंत्र्याच्या चळवळीत जाणार होते; पण नंतर कुटुंबात असे ठरले की त्यांनी व्यवसाय सांभाळावा आणि पत्नी अनसूयाबाई यांनी चळवळीत जावे आणि तसेच झालेदेखील.
अनसूयाबाईंचे नातू आणि नागपुरातील प्रसिद्ध व्यावसायिक विलास काळेंनी सांगितलेली ही आठवण. अनसूयाबाई या पुरोगामी विचारांच्या होत्या. कुटुंब नियोजन या विषयावर त्यांनी एकदा थेट महात्मा गांधींशी तात्विक वाद घातला. ‘कुटुंब लहान असावे हे मला मान्य आहे; पण त्यासाठी प्रत्येकाने स्वत:वर नियंत्रण ठेवावे आणि लोकसंख्या वाढू देऊ नये’, असे गांधीजींचे म्हणणे होते; पण लोकसंख्येवर नियंत्रण हे कायद्याने आणावे लागेल, असे अनसूयाबाईंचे म्हणणे होते. सात-आठ मुले जन्माला घालण्याचा मोठा त्रास महिलांना होतो. आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होतो, तेव्हा कुटुंब नियोजनाचा कायदा करणे हाच उत्तम पर्याय असल्याचा आग्रह त्यांनी धरला. १९३६ च्या सुमारास घडलेला हा प्रसंग. पुढे १९५२ मध्ये त्या खासदार झाल्या तेव्हा केंद्रीय आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर यांना भेटून त्यांनी कुटुंब नियोजनासाठीचा कायदा आणण्यासाठी पुढाकार घेतला.
ब्रिटिशांविरुद्ध बंड करणाऱ्या आष्टी, चिमूरमधील तरुणांना फाशीची शिक्षा होऊ नये यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध विविध पातळ्यांवर संघर्ष केला आणि त्यात यशही मिळविले. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सक्रिय भाग घेतला. अनसूयाबाईंचे माहेर मूळचे बेळगावचे होते. तेथील नामवंत वकील सदाशिवराव भाटे हे अनसूयाबाईंचे वडील. ते लोकमान्य टिळक यांचे अत्यंत जवळचे मित्र होते. बेळगावचा भाटे वाडा आजही सुप्रसिद्ध आहे. या वाड्यात स्वामी विवेकानंद काही दिवस वास्तव्यास होते. अनसूयाबाई १९५७च्या निवडणुकीत काँग्रेसतर्फेच पुन्हा नागपुरातून विजयी झाल्या. मात्र, १९५९ मध्ये खासदार असतानाच त्यांचे निधन झाले. त्या ज्या दोन्ही निवडणुका लढल्या व जिंकल्या त्यात त्यांनी केलेला खर्च हा कुटुंबाची मालकी असलेल्या कंपनीत त्यांच्या खात्यात जमा झालेल्या नफ्यातून वळता करण्यात आला होता. निवडणूक खर्चावर कोणीही शंका घेऊ नये यावर त्यांचा कटाक्ष होता.