नागपूर : नागपूर शहरातील फुटाळा, अंबाझरी, सोनेगाव तलावांच्या स्वच्छतेसाठी महापालिका बॅटरीआधारित बोटीचा वापर करणार आहे. यामुळे तलाव स्वच्छतेला गती मिळणार आहे.
महापालिकेला प्राप्त झालेली ही बोट बॅटरीवर आधारित असून एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर सुमारे ४ ते ५ तास कार्य करते. एका तलावात एकावेळी ४ ते ५ किमी पर्यंत स्वच्छतेचे कार्य करण्याची क्षमता या बोटीची आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीएसआर निधीतून ही बोट प्राप्त झाली आहे. कार्पोरेशनकडून तांत्रिक व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात तलाव स्वच्छतेच्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
आठवड्यातील प्रत्येकी दोन दिवस एका तलावाची स्वच्छता केली जाईल. सोमवार व मंगळवारी फुटाळा तलाव, बुधवार व गुरुवारी अंबाझरी तलाव आणि शुक्रवार व शनिवारी सोनेगाव तलावाची स्वच्छता बोटीद्वारे केली जात आहे. तलावात टाकला जाणारा कचरा पाण्यावर तरंगत असतो. त्यामुळे तलावातील पाणी दूषित होते शिवाय तलावाचेही प्रदूषण वाढते. बोटीमुळे तलावात असलेला कचरा काढल्याने तलाव स्वच्छ ठेवण्यास मदत होणार आहे.