बादशाह हायकोर्टात : राज्य शासनाला नोटीसनागपूर : सत्र न्यायालयाने अश्लील गाणी गाण्याचा आरोप असलेला पंजाबी रॅप गायक आदित्य पी. पी. सिंग ऊर्फ बादशाह याला पाचपावली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करताना पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाता येणार नाही अशी अट ठेवली आहे. ही अट रद्द करण्यासाठी बादशाहने केलेला अर्ज सत्र न्यायालयाने काही दिवसांपूर्वी खारीज केला. या निर्णयाविरुद्ध त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल केला आहे. उच्च न्यायालयाने याप्रकरणी राज्य शासनाला नोटीस बजावून २६ आॅगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी रॅप गायक यो यो हनीसिंग व बादशाह यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी दोघांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. हे अर्ज प्रलंबित असून दोघेही तात्पुरत्या अटकपूर्व जामिनावर बाहेर आहेत. बादशाहने एफआयआर रद्द करण्यासाठीही उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. बादशाहतर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर व अॅड. अमित कुकडे यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)
विदेशात जाण्यावरील बंदी हटवा
By admin | Published: August 22, 2015 3:12 AM