नागपुरातील रोडवरील धोकादायक वीज खांब हटवा :हायकोर्टाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 09:23 PM2019-07-03T21:23:22+5:302019-07-03T21:24:53+5:30
रोडवरील धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स चार महिन्यात हटविण्यात यावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महापालिका व महावितरण यांना दिला. तसेच, या कामाला चार आठवड्यात सुरुवात करण्यास सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रोडवरील धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स चार महिन्यात हटविण्यात यावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महापालिका व महावितरण यांना दिला. तसेच, या कामाला चार आठवड्यात सुरुवात करण्यास सांगितले.
यासंदर्भात न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली असून, त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेतील माहितीनुसार शहरातील २२ रोडवर धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स आहेत. १७ वर्षांपूर्वी एकात्मिक रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील रोड रुंद करण्यात आले. त्यामुळे विजेचे खांब व ट्रान्सफार्मर्स रोडवर आले. असे धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स तत्काळ हटविणे आवश्यक होते. परंतु, महापालिकेने यासंदर्भात उदासीनता दाखवली. परिणामी, धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स आजही यमदूत बनून रोडवर उभे आहेत. याविषयी यापूर्वी दाखल करण्यात आलेली रिट याचिका उच्च न्यायालयाने २१ नोव्हेंबर २००५ रोजी निकाली काढताना रोडवरील धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स हटविण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्या आदेशाचे पालन करण्यात आले नाही. मनपाने न्यायालयाचा अवमान केला. तसेच, २००१ मध्ये धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स हटविण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्या रकमेमध्ये भ्रष्टाचार करण्यात आला. परिणामी परिस्थिती जैसे थे आहे. न्यायालय मित्र अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी याचिकेचे, मनपातर्फे अॅड. सुधीर पुराणिक तर, नासुप्रतर्फे अॅड. गिरीश कुंटे यांनी कामकाज पाहिले.