धोकादायक वीज खांब हटविण्यासाठी २० कोटी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 07:47 PM2019-09-04T19:47:55+5:302019-09-04T19:49:23+5:30
रोडवरील धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स हटविण्यासाठी महापालिकेला २० कोटी रुपये द्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महावितरण कंपनीला दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रोडवरील धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स हटविण्यासाठी महापालिकेला २० कोटी रुपये द्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महावितरण कंपनीला दिला. तसेच, ही रक्कम मिळाल्यानंतर महापालिकेने धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स हटविण्याचे काम तातडीने सुरू करावे, असे सांगितले. या प्रकरणावर आता २० सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली असून त्यावेळी मनपा, महावितरण, वाहतूक पोलीस व इतर संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यासंदर्भात न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व मिलिंद जाधव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेतील माहितीनुसार, शहरातील २२ रोडवर धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स आहेत. १७ वर्षांपूर्वी एकात्मिक रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील रोड रुंद करण्यात आले. त्यामुळे विजेचे खांब व ट्रान्सफार्मर्स रोडवर आले. असे धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स तत्काळ हटविणे आवश्यक होते. परंतु, महापालिकेने यासंदर्भात उदासीनता दाखविली. परिणामी, धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स आजही यमदूत बनून रोडवर उभे आहेत. याविषयी यापूर्वी दाखल करण्यात आलेली रिट याचिका उच्च न्यायालयाने २१ नोव्हेंबर २००५ रोजी निकाली काढताना रोडवरील धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स हटविण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्या आदेशाचे पालन करण्यात आले नाही. तसेच, २००१ मध्ये धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स हटविण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्या रकमेमध्ये भ्रष्टाचार करण्यात आला. परिणामी परिस्थिती जैसे थे आहे. न्यायालय मित्र अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी याचिकेचे कामकाज पाहिले.