वर्धा रोडवरील साई मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 11:58 PM2020-07-10T23:58:03+5:302020-07-10T23:59:16+5:30
वर्धा रोडवरील साई मंदिर परिसरातील अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी श्री साईबाबा सेवा मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा रोडवरील साई मंदिर परिसरातील अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी श्री साईबाबा सेवा मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने महानगरपालिका आयुक्त, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त, नागपूर सुधार प्रन्यास सभापती व मंदिर परिसरात अतिक्रमण केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींना नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. श्री साईबाबा सेवा मंडळाने ३१ डिसेंबर १९७४ रोजी पी. के. बॅनर्जी व शिबाणी बॅनर्जी यांची १० हजार ८९४ चौरस फूटाची जमीन (ख. क्र. ४३/४) ३५ हजार रुपयांमध्ये तर, लक्ष्मण भोयर व इतरांची ४५०० चौरस फूट जमीन (ख. क्र. ४३/६) ९३ हजार ५०० रुपयांमध्ये खरेदी केली. दोन्ही जमिनी विवेकानंदनगर येथे आहेत. या जमिनीच्या काही भागावर नऊ व्यक्तींनी अतिक्रमण करून दुकाने बांधली आहेत. १९ मार्च १९९९ रोजी नागपूर सुधार प्रन्यासने अवैध बांधकाम पाडण्याची नोटीस बजावल्यानंतर या व्यक्तींनी दिवाणी न्यायालयात दावे दाखल केले होते. परंतु, त्यांना संबंधित जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करता आला नाही. त्यामुळे त्यांना जमिनीचा ताबा स्वत:कडे ठेवण्याचा अधिकार नाही. १ जानेवारी २०२० रोजी महानगरपािलकेने सर्वांना नोटीस बजावून जमीन रिकामी करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, पुढे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे अतिक्रमण कायम आहे. दर गुरुवारी ५० हजारावर भाविक साईबाबांच्या दर्शनाकरिता मंदिरात येतात. त्यांना पार्किंगकरिता त्रास सहन करावा लागतो. मंदिर परिसरातील अतिक्रमणामुळे वाहने पार्किंगची व्यवस्था करता येत नाही, असे मंडळाचे म्हणणे आहे. मंडळातर्फे अॅड. तुषार मंडलेकर तर, मनपातर्फे अॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.