झाडे, वीज तारांना गुंतलेला नायलॉन मांजा काढा; हायकोर्टाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 11:37 AM2021-02-27T11:37:27+5:302021-02-27T11:37:50+5:30
Nagpur News संभावित दुर्घटना टाळण्यासाठी झाडे व वीज तारांना गुंतलेला नायलॉन मांजा काढून त्याची नियमानुसार विल्हेवाट लावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी महानगरपालिकेला दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संभावित दुर्घटना टाळण्यासाठी झाडे व वीज तारांना गुंतलेला नायलॉन मांजा काढून त्याची नियमानुसार विल्हेवाट लावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी महानगरपालिकेला दिला. तसेच, याकरिता सामाजिक संस्था व नागरिकांना सोबत घेऊन मोहीम राबवावी आणि येत्या दोन आठवड्यात याचा अहवाल सादर करावा असेही महानगरपालिकेला सांगण्यात आले.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन जामदार व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने नायलॉन मांजाची विक्री व वापर थांबविण्यासाठी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. सध्या नायलॉन मांजाचा वापर बंद आहे. परंतु, संक्रांत काळात पतंग उडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा वापरण्यात आला. पतंग कापल्या गेल्यानंतर झाडे, वीज खांब इत्यादी ठिकाणी अडकलेला मांजा अद्याप कायम आहे. त्या मांजामुळे पक्षी जखमी होत आहेत. तसेच, वीज तारांना गुंतलेला मांजा कधीही मोठ्या दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकतो. प्रकरणातील न्यायालय मित्र ऍड . देवेंद्र चव्हाण यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. परिणामी, न्यायालयाने सदर आदेश दिला.