नागपूर : मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सिव्हिल लाइन्स परिसरात शुक्रवारी अतिक्रमण काढण्याची कारवाई केली. या कारवाईला सरकारी कर्मचाऱ्यांकडूनच विरोध करण्यात आला. त्यामुळे जीएसटी कार्यालयापुढे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
पथक शुक्रवारी दुपारी जीएसटी कार्यालयापुढील चहा व नाश्त्याच्या दुकानांचे अतिक्रमण काढीत होते. कारवाही बघून राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईला विरोध केला; परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने वाद शांत झाला. दरम्यान, सदर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाला घटनास्थळी बोलाविण्यात आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ॲक्सिस बँकेसमोरील नाश्त्याचे दुकानसुद्धा हटविण्यात आले. माउंट रोडवरील फुटपाथवर असलेले भाजी व फळविक्रेत्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. दुसऱ्या पथकाने नेहरूनगर झोनअंतर्गत ईश्वरनगर चौक ते हसनबाग चौक, खरबी चौक ते वाठोडा चौक, संत गोरा कुंभार चौक ते केडीके कॉलेज चौक व जगनाडे चौकादरम्यान ३२ अतिक्रमणे काढली. तिसऱ्या टीमने सतरंजीपुरा झोनअंतर्गत धान्य बाजार पोलीस चौकीजवळील राजेश जैस यांचे मोडकळीस आलेले घर पाडण्याची कारवाई सुरू होती. दरम्यान, घराचे गेट व भिंतीचा काही भाग पाडण्यात आला. घरमालकाला १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई विभागाचे उपायुक्त अशोक पाटील, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.