लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नगरदेवी म्हणून प्रख्यात असलेल्या गणेशपेठ येथील श्री आग्याराम देवी मंदिराच्या दरबाराला भव्य रूप प्रदान केले जात आहे. नव्या रचनेनुसार देवीची मूर्ती ३१ किलो चांदीच्या सिंह दालनात विराजमान होणार आहे. हे सिंह दालन मेहराब सारखे असेल. राजेश रोकडे आणि सारंग रोकडे यांच्या मार्गदर्शनात ही कारागिरी होत आहे. मंदिरात सुरू असलेली सुरेख नक्काशी कोल्हापूरच्या कलाकारांद्वारे केली जात आहे. राजाराम बापुसो पाटील, प्रमोद लोहार आणि अनिल सुतार मंदिरातच सिंह झरोका तयार करत आहेत.
गेल्या वर्षीच कार्तिक पौर्णिमेला ६० किलो चांदीने तयार करण्यात आलेले मातेचे निज मंदिर लोकार्पित करण्यात आले होते. कोरोनामुळे आग्याराम देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी गर्भगृहाचे पाट भाविकांसाठी उघडे असतील. भाविक दूरूनच मुख्य द्वारावरून मातेचे दर्शन करू शकतात. मात्र, सिंह दालन तयार केले जात असल्याने दोन दिवस गर्भगृह बंद ठेवण्यात येणार आहे. मातेचा दरबार सजवण्यासाठी उपाध्यक्ष बाबा उपाख्य सुरेश तिवारी, सचिव हरिओम अग्रवाल, कोषाध्यक्ष विकास पेटकर, माजी उपाध्यक्ष गिरजाशंकर अग्रवाल, विनोद आष्टीकर, रामचंद्र पिल्लारे, सल्लागार. आनंद गोरे, भैयाजी रोकडे, वास्तुविशारद सुरेश चिचघरे, महेश अग्रवाल, चंदन गोस्वामी, पवन तिवारी सहकार्य करत आहेत.
मातेच्या आठ रूपांचे होईल दर्शन
श्री आग्याराम देवीच्या उजव्या आणि डाव्या भागाला चांदीने मातेच्या आठ रूपांनी दर्शविले जाईल. आग्याराम देवी मातेच्या मूळ मूर्तीसह चांदीने साकारलेल्या मातेच्या आठ रूपांचे दर्शन होऊ शकणारे हे नागपुरातील पहिलेच मंदिर ठरणार आहे.
असे असेल निज मंदिरचे स्वरूप
भक्तांनी दान केलेल्या चांदीतूनच सिंह दालन तयार केले जात असल्याचे श्री आग्याराम देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गिरीश व्यास यांनी सांगितले. चांदीचे पत्रा निज मंदिरात दोन्ही बाजूला, दोन गजराजांच्या स्वरूपात स्थापित केले जाईल. निज मंदिरात चांदीचा एक मोठा आणि चार लहान गुबुद, दोन मोठे व चार मध्यम तसेच १९ लहान कलश आणि आठ पिल्लर असतील, असे व्यास म्हणाले.
..........