मुंबई : जगातील एका नामवंत कंपनीचा महत्त्वाकांक्षी माहिती-तंत्रज्ञान (आयटी) प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार असून त्यासाठी ९० एकर जमीन मिहानअंतर्गतच्या एसईझेडमध्ये देण्याचा निर्णय महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
सूत्रांनी सांगितले की, आयटी हब उभारण्यासाठी या कंपनीने मिहानमधील ९० एकर खरेदी करण्याची तयारी दर्शविली होती. मिहानमध्ये तारांकित हॉटेलांपासून व्यावसायिक वापरासाठी १५.५ एकर जमीन देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. त्यासंबंधीच्या प्रस्तावास बुधवारच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या शिवाय, जेएसआर डायनॅमिक्स ही कंपनी संरक्षण सामुग्रीच्या उत्पादनाचा भव्य प्रकल्प मिहानमध्ये उभारणार असून त्यासाठी २७ एकर जागा देण्याचा निर्णयही घेण्यात आला.पुरंदर, सोलापूर, चंद्रपूर येथील विमानतळांच्या प्रगतीचाही आढावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला.चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील मूर्ती, विहीरगाव येथे नवीन विमानतळ उभारण्यात येणार असून त्याच्या कामास गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव राजीव जलोटा, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, सामान्य प्रशासनच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी उपस्थित होते.
अमरावती विमानतळ विस्तारअमरावतीच्या विमानतळाचा विस्तार करण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन १३ जुलै रोजी होणार आहे. सध्याची धावपट्टी १३७४ मीटर असून ती आता १८५० मीटर करण्यात येणार आहे. या कामास आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मार्च २०२० पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार असून त्यावर ३६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठी विमाने उतरू शकतील व नाईट लँडिंगही सुरू होईल. टर्मिनल बिल्डिगही उभारण्यात येणार आहे.शिर्डी विमानतळाचा विस्तारशिर्डी विमानतळास मिळत असलेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता या विमानतळाचा विस्तार करण्यात येणार असून नवीन टर्मिनल बिल्डिंग तातडीने उभारण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी आजच्या बैठकीत दिले. १ आॅक्टोबर २०१८ पासून आजपर्यंत या विमानतळावरून ५७४४ उड्डाणे झाली आणि ४ लाख १० हजार जणांनी प्रवास केला.