नागपूर : स्वातंत्र्यसेनानी व विख्यात चित्रकार अरुणदादा मोरघडे यांचे सोमवारी सकाळी १०.३० वाजता जागनाथ बुधवारी येथील निवासस्थानी निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. गंगाबाई घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
१४ ऑगस्ट १९२७ रोजी जन्म झालेल्या अरुणदादा मोरघडे यांनी ६५ वर्षे चित्रकला व साहित्य सेवा केली आहे. महात्मा गांधी व आचार्य धर्माधिकारी यांच्या विचारांच्या प्रेरणेने ते १९४२ मध्ये इंग्रजांविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, त्यांना भूमिगतही व्हावे लागले होते. स्वातंत्र्य युद्धातील योगदानासाठी त्यांना शासनातर्फे १९९५ मध्ये सन्मानित करण्यात आले होते. शिवाय, चित्रकला व साहित्य क्षेत्रातील याेगदानासाठी विदर्भ साहित्य संघाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
२००४ मध्ये त्यांना जागतिक साहित्य संमेलनात सन्मानित करण्यात आले होते. पारंपरिक ते आधुनिक चित्र नव्या पद्धतीने साकारण्यात त्यांचा हातखंडा होता. चित्रांतून साहित्य समन्वय साधण्याचे कार्य त्यांनी पाच दशक केले. ते व्यक्तिचित्रणात सिद्धहस्त होते. वास्तववादी चित्रणासाठी त्यांनी जगदलपूर या दुर्गम भागात प्रवास करून चित्र निर्मिती केली होती. गडचिरोली येथील मार्कण्डा येथे वास्तव्य करून त्यांनी मंदिराच्या स्थापत्य कलेचा अभ्यास करून चित्रनिर्मिती केली होती.
अमूर्त व वास्तववादी चित्र हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वासाठी त्यांना महाराष्ट्र शासन, गिरीष गांधी फाउंडेशन, रसिक राज साहित्य संस्था, चित्र महर्षी अरुणदादा फाऊंडेशनच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. यशवंतराव चव्हाण फोरमच्या वतीने ‘अनादी’ या उपक्रमात अरुणदादा मोरघडे, नाना मिसाळ व दीनानाथ पडोळे या प्रख्यात चित्रकारांना एकत्र आणण्याचे कार्य झाले होते.
..............