नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीची पुनर्रचना तातडीने करा, अशी मागणी भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष प्रकाश बन्सोड यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सावंत यांना पत्रही पाठवले आहे.
राज्यातील सत्तातंरण झाल्यानंतर २७ जानेवारी २०२० राेजी शासन निर्णयानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नेमणुका रद्द केल्या. याला आता वर्ष झाले. राज्य शासनाने नुकतेच ज्योतिबा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीची पुनर्रचना केली. यात सदस्यांची नेमणूक केली. त्याबद्दल शासनाचे अभिनंदन. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या पुनर्रचनेकडे दुर्लक्ष का, असा प्रश्नही या निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी तातडीने या समितीवर सदस्यांची नेमणूक करून समितीचे काम सुरु करावे, अशी मागणी प्रकाश बन्सोड यांनी केली आहे.