कुही : तालुक्यातील मांढळ येथे दाेन वर्षांपूर्वी मुख्य रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले, परंतु रस्त्याच्या अप्राेचला असलेल्या कडा न भरल्याने या ठिकाणी अपघात घडत आहेत, शिवाय या ठिकाणी भेगा पडल्या असून, या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत नागरिकांच्या शिष्टमंडळाने आ.राजू पारवे यांच्याकडे निवेदन साेपविले आहे.
मांढळ येथील बस स्थानक परिसरात दीड किमी लांबीचा सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. हा रस्ता पूर्वीच्या रस्त्यापेक्षा दोन फूट उंच असल्याने, या रस्त्याला जोडलेल्या गल्लीमधील अप्रोच रोडमध्ये अंतर पडले आहेत, तसेच रस्ता दुभाजकाच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे दुचाकीस्वाराचे कित्येकदा अपघात झाले आहेत. अनेकांना अपघातात गंभीर दुखापतही झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुही येथील उपविभागीय अधिकारी पराग ठमके यांना वारंवार सूचना, निवेदन देऊनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या रस्त्याच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष पुरवून सिमेंट रस्ता ते अप्राेच राेडचे अंतर भरून डागडुजी करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सुरेश कुकडे, जि.प. सदस्य मनीषा फेंडर, सरपंच शाहू कुलसंगे, उपसरपंच सुखदेव जिभकाटे, बंडू वैद्य, पांडुरंग मेश्राम, शंकर मेश्राम, रोमेश वैद्य, उज्ज्वल वैद्य आदी उपस्थित होते.