लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : सावरगाव-खामली या पाणंद रस्त्यालगत सावरगाव, खामली व इतर गावांमधील शेतकऱ्यांची शेती आहे. या पाणंद रस्त्याची दैनावस्था झाल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या शेताची वहिवाट व शेतमालाची ने-आण करताना विविध अडचणींना ताेंड द्यावे लागते. त्यामुळे या पाणंद रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य देवका बाेडके व पंचायत समिती उपसभापती वैभव दळवी यांच्याकडे केली आहे.
या पाणंद रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी आपण पाच वर्षांपासून पाठपुरावा करीत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली असून, प्रशासन लक्ष देत नसल्याचा आराेप त्यांनी केला आहे. पावसाळ्यात दरवर्षी हा रस्ता चालण्याच्या लायकीचा नसताे. त्यामुळे वहिवाट करताना व शेतमालाची वाहतूक करताना विविध अडचणी येत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे, या पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आल्यानंतर आपण या रस्त्याची नुकतीच पाहणी केली आहे. त्याची तातडीने दुरुस्ती व खडीकरण व्हावे, यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्रयत्न करणार असल्याची माहिती देवका बाेडके व वैभव दळवी यांनी दिली. या पाहणीच्यावेळी एकनाथ रेवतकर, रमेश रेवतकर, पुरुषोत्तम बोडखे, विवेक बालपांडे, अनिकेत सावंत, लक्ष्मण क्षीरसागर, गुणवंत बेलखेडे, शिवाजी बारई, हेमराज गिरडकर, रामदास रेवतकर, यशवंत बेलखेडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.