लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एआय एमआरओमध्ये ४५ दिवसांपूर्वी मोठ्या दुरुस्तीसाठी आलेले एअर इंडियाचे विमान ओव्हरहाॅल व मेंटेनन्सचे काम पूर्ण झाल्यानंतर रविवारी रवाना झाले. या मेंटेनन्सच्या कामात एमआरओमधील जवळपास ४० टक्के महिला तंत्रज्ञ व नाॅन-टेक्निकल स्टाफ सहभागी राहिले हे विशेष.
नागपुरातून विदेशात रवाना झालेले बोईंग ७७७ हे जूनच्या अखेरीस नागपुरात मेंटेनन्ससाठी आले होते. सूत्रांनुसार सध्या ३० सप्टेंबरपर्यंत विदेशी उड्डाणांवर बंदी आहे. त्यामुळे एअर इंडिया व एमआरओला अधिकाधिक विमानांच्या देखभाल-दुरुस्तीची संधी मिळाली आहे. दुसरीकडे, एमआरओमध्ये गेल्या दीड वर्षापासून एअर इंडियाचे दुसरे एक विमान आतापर्यंत दुरुस्त होऊ शकलेले नाही. केंद्र सरकारने व्हीव्हीआयपींसाठी दोन नवीन विमाने खरेदी केल्यानंतर अमेरिकेत याचे नवीनीकरण केले जात आहे. यातून निघणाऱ्या सामानांमधूनच दीड वर्षांपासून मेंटेनन्ससाठी अडकून पडलेले विमान दुरुस्त केले जाणार असल्याचेही सांगितले जाते.