शासनाची हायकोर्टात माहिती : नियमबाह्य सावकारी कर्जाचे प्रकरण नागपूर : राज्यातील सावकारांनी त्यांच्या अधिकारक्षेत्राबाहेरच्या शेतकऱ्यांना दिलेले कर्ज माफ करण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) कायद्यातील कलम ४ मध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे अशी माहिती राज्य शासनाने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संतोषसिंग संधू यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले. हे कर्ज माफ केल्यास कलम ४ मधील तरतुदींचे उल्लंघन होते. परिणामी सर्वप्रथम कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचे असून ही बाब शासनाच्या विचाराधीन आहे. यावर अद्याप अंतिम निर्णय झाला नाही असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले. शासनाने सावकारांना कर्ज वितरणाचे परवाने देताना कार्यक्षेत्र ठरवून दिले आहे. हे कार्यक्षेत्र शहर व तालुकास्तरीय आहे. शहरापुरता परवाना असलेल्या सावकारांना शहराबाहेरच्या शेतकऱ्यांना कर्ज देता येत नाही. तालुकास्तरीय परवान्याच्या बाबतीतही असेच आहे. परंतु, राज्यातील अनेक सावकारांनी स्वत:च्या अधिकारक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना कर्ज दिले आहे. असे कर्ज घेणारे शेतकरी हजारोच्या संख्येत आहेत. शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ करण्यासंदर्भात १० एप्रिल २०१५ रोजी ‘जीआर’ जारी करण्यात आला आहे. परंतु, सावकारांनी स्वत:च्या अधिकारक्षेत्राबाहेरच्या शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जांना हा ‘जीआर’ लागू होत नाही. त्याविरुद्ध देऊळगाव (अकोला) येथील सावकारग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अरुण इंगळे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांनी शासनाच्या प्रतिज्ञापत्राचे अवलोकन केल्यानंतर प्रकरणावरील सुनावणी दोन आठवडे तहकूब केली. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. विपूल भिसे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
कर्जमाफीसाठी कायद्यात दुरुस्ती आवश्यक
By admin | Published: February 11, 2017 2:47 AM