कामठी/मौदा/वाडी/कळमेश्वर/पारशिवनी : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांना देशभरातून विरोध होत आहे. चार महिन्यापासून या कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. यात आतापर्यंत ३०० शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांच्या वतीने शुक्रवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. याला पाठिंबा देत नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी धरणे आंदोलन करीत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला.
कळमेश्वर तालुक्यात ब्राह्मणी फाट्यावर काँग्रेसने धरणे आंदोलन करीत शेतकरी विरोधी कायदे व इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. येथे राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केंद्र सरकारच्या कृषी विरोधी धोरणावर टीका केली. पंतप्रधान पश्चिम बंगाल येथे जाऊन प्रचार सभा घेत आहेत. मात्र त्यांना शेतकऱ्यांना भेटण्यासाठी वेळ नाही का, असा सवाल उपस्थित नेत्यांच्या वतीने याप्रसंगी करण्यात आला. कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, माजी सभापती श्रावण भिंगारे, उपसभापती जयश्री वाळके, खरेदी-विक्री अध्यक्ष बाबाराव कोढे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाबाराव पाटील, काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक भागवत, माजी प्रशासक वीरेंद्र सिंह बैस, जिल्हा परिषद सदस्य देवानंद कोहळे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
दत्तवाडी येथे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्या कुंदा राऊत, जि.प.सभापती भारती पाटील, पं.स. सभापती रेखा वरठी, नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष भीमराव कडू, नागपूर तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश कोकाटे, दुर्योधन ढोणे, उपाध्यक्ष अनिल पाटील, हिंगणा विधानसभा युवक काँग्रेस कमिटी अध्यक्ष अश्विन बैस, वाडी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष शैलेश थोराने आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
कामठी-मौदा रोडवर महालगाव येथे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. कामठी पंचायत समितीचे उपसभापती आशिष मल्लेवार, कामठी तालुका युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष दिनेश ढोले, माजी शिक्षण सभापती पुरुषोत्तम शहाणे, महालगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश गजभिये ,उपसरपंच निर्मला इंगोले, टेमसना ग्रामपंचायतचे सरपंच अनिकेत शहाणे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. यासोबतच मौदा येथे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सरकारने तिन्ही शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे आणि इंधन दरवाढीतून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हुकूमचंद आमधरे, कृषी सभापती तापेश्वर वैद्य, माजी जि.प.सदस्या अवंतिका लेकुरवाळे, पंचायत समिती सदस्य दीपक गेडाम, अनिल बुराडे, ज्ञानेश्वर वानखेडे, तुळशीराम काळमेघ, जि.प. सदस्या शालिनी देशमुख, माजी पं.स.सभापती दुर्गा ठवकर, आशिष पाटील, निमखेड्याचे सरपंच प्रमोद बरबटे, विक्की साठवणे, स्वप्नील श्रावनकर, अशोक डडूरे, मनोज कडू, शेषराव देशमुख यांच्यासह स्थानिक शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. पारशिवणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यानंतर आंदोलकांनी तहसीलदारामार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर केले. जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे ,पारशिवनी तालुका अध्यक्ष दयाराम भोयर, जीवलग चव्हाण, पंचायत समिती सभापती मीना कावळे, उपसभापती चेतन देशमुख, संदीप भलावी, वीरु गजभिये, श्रीधर झाडे, किशोर मिरे, अशोक चिखले आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.