आनंद डेकाटे
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (फेलोशीप)साठी असलेली राष्ट्रीय मानांकन शिक्षण संस्थेची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता देशातील कोणत्याही विद्यापीठातील पात्र विद्यार्थी या फेलोशीपचा लाभ घेऊ शकेल. इतकेच नव्हे, तर बार्टीने विद्यार्थ्यांची संख्याही दरवर्षी २०० इतकी वाढविली आहे.
पीएचडी व एमफील करणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (फेलोशीप) ही योजना २०१३ पासून बार्टीने सुरू केली. या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल तर तो अर्जदार राष्ट्रीय मानांकित शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असावा ही जाचक अट टाकण्यात आली. राज्यात अशा मानांकित संस्थांमध्ये समावेश होणारी विद्यापीठे मोजकीच आहे. त्यात एकही पशुवैद्यक व कृषी विद्यापीठसुद्धा नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ पाहिजे तसा विद्यार्थ्यांना मिळू शकत नव्हता. या योजनेची मागील सात वर्षांतील एकूण लाभार्थी संख्या केवळ १०५ इतकी होती. गेल्या दोन वर्षात तर जाहिरातच आली नाही. चालू वर्षात देखील यात फक्त एकाच लाभार्थ्याला लाभ मिळाला आहे. त्यामुळे या योजनेची जी अट घातली होती ती मुळातच विद्यार्थ्यांसाठी जाचक बनली होती. अनेक शिक्षण व सामाजिक संघटनांनी याविरोधात आवाजही उचलला. अखेर बार्टीने ही जाचक अट रद्द केली
आंदोलनाला यशस्टुडंट हेल्पिंग हँडतर्फे आम्ही हा विषय लावून धरला होता. बार्टीचा उद्देश चांगला होता. परंतु राष्ट्रीय मानांकन शिक्षण संस्थेच्या अटीमुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना या फेलोशीपचा लाभ घेता येत नव्हता. २०१९ व २०२० या दोन्ही वर्षांच्या जागा वाढवून प्रत्येकी २०० करण्यात आल्या आहेत. आंदोलनाला यश आले.- कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडंट हेल्पिंग हँड