तरुणाई सज्ज : धडधडत्या हृदयातील भावना आज मागणार प्रीतीचे दानशफी पठाण नागपूरअवघी सृष्टी पानगळीच्या अस्वस्थ झळांना सामोरी जात असताना तरुणाईच्या मनात मात्र उमलत असतो प्रेमाचा नवा बीजांकुर...निष्पर्ण झाडे निरभ्र आकाशाला विरहाची व्यथा सांगत असताना तिकडे प्रेमवीरांच्या धुंद सुगंध भावनिक विश्वात मात्र प्रीतीचा उनाड स्वछंदी वारा शिंपत असतो प्रेमाचा अवीट गंध...या गंधाचा स्पर्श श्वासांना झाला की कळते आलाय तो दिवस ज्याला जग व्हॅलेंटाईन-डेच्या नावाने ओळखते. असा हा प्रेमोत्सव आज अवघ्या जगात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आपले नागपूरही त्याला अपवाद नाही. थरथरत्या हातात लालबुंद गुलाब घेऊन आपल्या जीवलगाला प्रीतीचे दान मागण्यासाठी येथील तरुणाई सज्ज झाली आहे. काही तथाकथित संस्कृती रक्षकांनी मागच्या काही वर्षात या प्रेमोत्सवाला संस्कृतीसाठी धोकादायक ठरवून बराच धुडगूस घातला होता. ही पाश्चिमात्यांची परंपरा असल्याचे सांगून या दिवसाला हिणवले होते. पण, प्रेम जसे सत्य आहे तसेच शाश्वतही आहे. ते अन्टार्टिकाच्या गारठवणाऱ्या बर्फात उमलते तसेच आफ्रिकेच्या रखरखत्या वाळवंटातही बहरत असते. प्रेमाला कधीच भौगोलिक सीमा मान्य नव्हत्या, नसतील. त्यामुळेच कुठला नि काय व्हॅलेंटाईन नावाचा एक फकीर माणूस हृदयाच्या टोकापासून प्रेमाचा अन्वयार्थ जगाला सांगतो आणि प्रेमाची ही संकल्पनाच वैश्विक असल्याने त्याची साद जगभरातील प्रेमवीरांना खुणावूलागते. हे प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबच का वापरतात माहिती आहे? गुलाब हा राजा असतो फुलांचा तसेच प्रेमही राजा असते नात्यातले. प्रेमाशिवाय नाते म्हणजे नुसतेच पाषाण. गुलाबाच्या फुलाची प्रकृती जशी नाजूक असते तसा प्रीतीचा बंधही हळवा असतो. गुलाब जसा सुगंधित असतो तसा प्रेमाचा गंधही दरवळत असतो आयुष्यभर आणि गुलाबातही लालच गुलाब का माहिती आहे? कारण, रक्ताचा रंग लाल असतो आणि एकदा का प्रेम रक्ताशी एकरूप झाले की मग त्याला विभक्त करता येत नाही म्हणून. अशा प्रत्येक गुलाबाचा चेहेरा वेगळा असतो. पण, त्याच्या हिरव्याकंच जरीदेठामध्ये वेढलेला प्रीतीचा लाल रंग सारखाच असतो जगभरात. अशाच गुलाबाच्या साक्षीने आज लाखो प्रेमवीर आपल्या अव्यक्त भावनांचा इजहार करणार आहेत. त्यासाठीची जोरदार तयारी कालच करण्यात आली आहे. गुलाब, गिफ्टची खरेदी पूर्ण झाली आहे. होकार मिळेल की नकार याची पर्वा कुणाला? अव्यक्त रेशमी भावनांना व्यक्त करण्याची संधी हा दिवस देतोय, हे काय कमी आहे? हॅप्पी व्हॅलेंटाईन-डे...प्रेमाच्या रंगात रंगणार फुटाळा, अंबाझरीआपल्या प्रेमभावना व्यक्त करताना सभोवतालचे ठिकाणही रोमँटिक असले पाहिजे, अशी अनेकांनी अपेक्षा असते. याच अपेक्षेतून दरवर्षी व्हॅलेंटाईन-डेला फुटाळा, अंबाझरी तलाव, तेलंखेडी गार्डन या ठिकाणी तरुणाईचे जत्थे पोहोचत असतात. यंदाही तेच घडणार आहे. खास व्हॅलेंटाईन-डेसाठी लाखो रुपयांचे गुलाबपुष्प नागपुरात विक्रीसाठी आले आहेत. जीवलगाचा फोटो असलेला कप, लॉकेट, हा दिवस अधिक गोड करण्यासाठी बाजारात आलेले चॉकलेट, प्रेमाचा रंग असलेला लाल टी-शर्ट अशी जोरदार खरेदी तरुणाईने केली आहे. ज्यांची आवडती व्यक्ती शहराबाहेर आहे त्यांच्यापर्यंत या प्रेमशुभेच्छा पोहोचविण्यासाठी व्हॉटस्अप, फेसबुक, हाईक यासारखी आॅनलाईन माध्यमेही सज्ज झाली आहेत.
पुन्हा आलाय प्रेमोत्सव, सुगंध उधळत सारा...
By admin | Published: February 14, 2017 2:22 AM