नागपूर : केरळमध्ये चर्चवर झालेला हल्ला तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पश्चिम महाराष्ट्रात हिंसाचार वाढला असून, त्या पार्श्वभूमीवर संघ मुख्यालय, भाजपा कार्यालय आणि नेत्यांच्या कार्यालय व निवासस्थानाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
तीन दिवसांपूर्वी केरळमधील प्रार्थनास्थळी बॉम्ब स्फोट झाला होता. त्यानंतर देशभरातील प्रमुख धार्मिक स्थळ आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संघ मुख्यालय, भाजपा कार्यालयासह शहरातील महत्त्वाच्या इमारतींच्या सुरक्षेचा आढावा घेतला. त्या आधारावर मनुष्यबळ आणि गस्त वाढविण्याचे निर्देश दिले.
संघ मुख्यालय पूर्वीपासून दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. संघ मुख्यालयावर हल्लाही झाला होता. वर्षभरापूर्वी लष्कर ए तोयबाच्या आतंकवाद्याने येथे येऊन संघ मुख्यालयाची रेकी केली होती. त्यामुळे संघ मुख्यालय परिसरात अतिरिक्त खुफिया पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. तसेच मराठा आरक्षणामुळे पश्चिम महाराष्ट्रात हिंसाचार वाढला आहे. नेत्यांच्या घरी-कार्यालयात आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयात तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थानही शहरात आहे. येथील सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
मराठा आंदोलनाबाबत नेत्यांच्या भूमिकेवर नाराजी आहे. त्यामुळे पोलिस कोणताही धोका पत्करण्याच्या तयारीत नाहीत. बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढविण्यात आली आहे. दिवाळी जवळ आल्यामुळे बाजारांमध्ये गर्दी वाढली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.