उमरेड : उमरेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांची नागपूर येथील नियंत्रण कक्षात बदली झाली. त्यांच्याऐवजी यशवंत कोळसे यांनी शनिवारी उमरेड पोलीस ठाण्याचा कार्यभार हाती घेतला. कोळसे नागपूर येथे नियंत्रण कक्षात पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्यावर होते. रुजू होताच त्यांनी ‘बोलायचे एक आणि करायचे भलतेच’ असे होणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले.
नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस आस्थापना मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार प्रशासकीय कारणास्तव त्वरित प्रभावाने तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. नागपूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश निर्गमित केल्यानंतर लागलीच कोळसे रुजू झाले. महिनाभरापासून सुरू असलेल्या दहेगाव येथील कोंबड्यांची झुंज यानंतर कदापिही होणार नाही. लपूनछपून जर कुणी हा गोरखधंदा करीत असेल तर कडक कारवाई केली जाईल, असे कोळसे यांनी सांगितले. लोकमतने ३ डिसेंबरला ‘इकडे माणसांची कोरोनाशी, तिकडे कोंबड्यांची झुंज’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. कोंबड्यांची झुंज, दारूचा ठिय्या आणि जुगाराचा गोरखधंदा चालविणाऱ्यांमध्ये यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळसुद्धा गाठले. तत्पूर्वीच या गोरखधंद्याचे ‘आयोजक’ पसार झाल्याने समजते. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत प्रतिनिधीने कोळसे यांना विचारणा केली असताना असे प्रकार तालुक्यात यापुढे खपवून घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. काळे यांच्या बदलीनंतर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.