नागपूर : हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गुगामल वनपरिक्षेत्राचा उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या जामीन अर्जावर एक आठवड्यात उत्तर सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला. अर्जावर न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
शिवकुमारने यापूर्वीही उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणात त्याच्याविरुद्ध प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यामुळे त्याने तो अर्ज मागे घेतला. त्यानंतर त्याने अचलपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज २० जून रोजी फेटाळण्यात आला. करिता, तो दुसऱ्यांदा उच्च न्यायालयात आला आहे. दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली, असा आरोप आहे. चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी हेदेखील आरोपी आहेत. शिवकुमारतर्फे अॅड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.