लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून कोविड रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. परंतु अतिगंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची सूट देण्यात आली आहे. जर एखाद्या रुग्णालयाने थेट रुग्णाला दाखल करून घेतले असेल तर त्या रुग्णालयाने तासाभरात संबंधित रुग्णाची माहिती नियंत्रण कक्षाला द्यायला हवी. या सवलतीचा उपयोग कोणत्याही रुग्णालयाने चुकीच्या पद्धतीने केला तर संबंधित रुग्णालयावर कारवाई केली जाईल, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली.
सोमवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी या नियंत्रण कक्षाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार दुष्यंत चतुर्वेदी, मनपाचे विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनातर्फे या कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांसाठी कोविड रुग्णालयांमध्ये खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कोविड रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर, ऑक्सिजन पुरवठ्याकरितादेखील वेगळा नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. मनपा मुख्यालयात सुरू करण्यात आलेला हा नियंत्रण कक्ष २४ तास सुरू असून, तीन शिफ्टमध्ये तज्ज्ञांची चमू उपलब्ध आहे. नियंत्रण कक्षाकडून पाठविण्यात आलेल्या रुग्णाला कोणतेही रुग्णालय परत पाठवू शकत नाही. कक्षाला बेडची माहिती देणेही बंधनकारक आहे. नागरिक बेडसाठी ०७१२-२५६७०२१ यावर संपर्क करू शकतात. त्याचप्रकारे व्हॉट्सॲप नंबर ७७७००११५३७, ७७७००११४७२ यावरही माहिती देऊ शकतात. रुग्ण ऑक्सिजन लेव्हल, एचआरसीटी, आरटीपीसीआर रिपोर्ट व्हॉट्सॲप नंबरवर पाठवू शकतात. रुग्णालयाबाबत तातडीने माहिती उपलब्ध केली जाते. रुग्णालयालाही अलर्ट केले जाते.