लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दरवर्षी भव्य स्वरूपात होणारा २६ जानेवारी रोजीचा गणराज्य दिन यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणानेच साजरा करण्यात येणार आहे. शाळा व मुख्य समारंभ हा साधेपणाने व मोजक्या लोकांमध्येच पार पडेल.
गणराज्य दिन हा दरवर्षी उत्साहात साजरा होतो. प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात व शासकीय कार्यालयांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात. रेलचेल असते. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच जाहीर कार्यक्रमांवर नियंत्रण आले आहे. स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रमही असाच साधेपणाने पार पडला. आता गणराज्य दिनसुद्धा उत्साहात पण साधेपणानेच साजरा होणार आहे. कार्यक्रमांमध्ये होणारी गर्दी या वेळी राहणार नाही. शाळा बंद असल्याने शाळेतही रेलचेल राहणार नाही. गणराज्य दिनी नागरिकांसाठी खुला राहणारा सीताबर्डीचा किल्ला यंदा बंदच राहील. गणराज्य दिनाचा मुख्य समारंभ हा कस्तुरचंद पार्कवर होईल, परंतु त्याचे स्वरूपही साधेच राहील. यंदा पथसंचलन होणार नाही, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले. एकूणच गणराज्य दिन यंदा साधेपणानेच साजरा होणार.
शासकीय इमारतींवर रोषणाई
गणराज्य दिनाचे कार्यक्रम साधेपणाने करण्यात येणार असले तरी शासकीय इमारतींवर रोषणाई करण्यात येणार आहे. त्याची तयारीही सुरू झाली आहे.