योगेंद्र शंभरकर
नागपूर : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांनी एकत्र येऊन आघाडी बनवून लढण्याची तयारी चालविली होती. मागील एक वर्षांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु काही मुद्द्यांवर सर्व गटांचे एकमत होऊ शकले नाही. परिणामी आघाडीच्या प्रयत्नांतच बिघाडी झाली. आता शहरात रिपब्लिकन गटांच्या दोन आघाड्या तयार झाल्या आहेत.
रिपब्लिकन सेनाचे सागर डबरासे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर)चे दिनेश अंडरसहारे, राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टीचे शेषराव गणवीर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संजय पाटील, आरपीआय (सोशल)चे सचिन गजभिये आणि आझाद समाज पार्टीचे संजय फुलझेले यांच्या नेतृत्वात सहा गटांनी रिपब्लिकन आघाडीची घोषणा केली आहे; तर दुसरीकडे रिपाइं, (गवई), रिपाइं (आठवले), पीरिपा-जाेगेंद्र कवाडे, खोरिपा- उपेंद्र शेंडे, रि.पा. एकतावादी- नाना इंदिसे, रि.प. ऐक्यवादी- दिलीप जगताप, खोरिपा- अविनाश कट्टी, खोरिपा- सुनील रामटेके, रिपा-ए- मोहन पटेल, रिपा स्वाभिमानी- मनोज संसारे व इतर संघटनांसह १० पक्षांनी मिळून संयुक्त रिपब्लिकन आघाडीची घोषणा केली आहे.
भूपेश थुलकर यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या संयोजन समितीमध्ये मुख्य संयोजक म्हणून अमृत गजभिये, हरिदास टेंभुर्णे, प्रकाश कुंभे, दिनेश गाेडघाटे, अशोक भीमगडे, कर्नल सिंह दिगवा, विनोद थूल यांचा समावेश आहे. आघाडी रिपाइंच्या सर्व राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेत आहे.
.
बॉक्स
आम्हालाही वाटते सर्वांनी एकत्र यावे
रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांनी एकत्र येऊन आघाडी बनवावी, याचे आम्हीही समथर्न करतो; परंतु काही गटांची राष्ट्रीय व राज्य स्तरांवर इतर राजकीय पक्षांशी युती आहे. अशा परिस्थितीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी नागपूर स्तरावर स्थानिक पदाधिकाऱ्यांना आघाडी बनविण्यासाठी सहमतीपत्र द्यायला हवे. एकत्र येण्यासाठी आमच्याकडून प्रयत्नही केले जात आहेत.
दिनेश अंडरसहारे, संयोजक, रिपब्लिकन आघाडी
- बॉक्स
- प्रयत्न झाले; पण यश आले नाही
आमची आघाडी ही अनेक वर्षे जुनी आहे. सर्वांना एकत्र घेऊन महापालिका निवडणूक लढण्याची तयारी होती. यासाठी आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडून परवानगीही मिळाली आहे; परंतु इतरांना कदाचित प्रस्थापित पक्षांसोबत मिळून लढायचे नाही. त्यामुळे प्रयत्नानंतरही एकजूट आघाडीला यश आले नाही. त्यांच्या आघाडीचे आम्ही स्वागत करतो.
प्रकाश कुंभे, संयोजक, संयुक्त रिपब्लिकन आघाडी