लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्नीला तिच्या कुटुंबीयांच्या कैदेतून मुक्त करण्यासाठी पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.अजयसिंग परिहार असे पतीचे नाव आहे. पत्नी निकिताला तिच्या कुटुंबीयांनी घरामध्ये कैद करून ठेवले आहे व तिचे दुसरे लग्न लावून देण्याची तयारी सुरू आहे असे अजयसिंग यांचे म्हणणे आहे. त्यांच्या याचिकेतील माहितीनुसार, अजयसिंग व निकिताने ६ सप्टेंबर २०१८ रोजी आर्य समाज मंदिरात हिंदू पद्धतीने प्रेमविवाह केला. त्यानंतर कुटुंबीयांचा विरोध लक्षात घेता दोघांनीही २१ सप्टेंबर २०१८ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन लग्नाची माहिती दिली व सुरक्षेची मागणी केली. असे असताना पोलिसांनी काहीच मदत केली नाही. निकिताला तिचे कुटुंबीय सोबत घेऊन गेले. त्यांनी निकिताला घरात कैद करून ठेवले. अजयसिंग यांनी कायदेशीर मार्गाने निकिताला सोडविण्याचे बरेच प्रयत्न केले, पण त्यांना कुणाचेच सहकार्य मिळाले नाही. अखेर, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.निकिताला हजर करण्याचा आदेशया प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता निकिताला येत्या २३ जानेवारी रोजी न्यायालयात हजर करण्याचा आदेश एमआयडीसी पोलिसांना दिला. तसेच, निकिता व अजयसिंग यांच्या कुटुंबीयांना त्या दिवशी न्यायालयात येण्यास मनाई केली. अजयसिंगतर्फे अॅड. पी.एम. सिन्हा यांनी बाजू मांडली.
पतीची हायकोर्टाला विनंती : माझ्या पत्नीला कैदेतून मुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 8:51 PM
पत्नीला तिच्या कुटुंबीयांच्या कैदेतून मुक्त करण्यासाठी पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.
ठळक मुद्देप्रेमविवाहाला कुटुंबीयांचा विरोध