एस. बी. सिंग : कारगील विजय दिवस साजरानागपूर : मुलांना सामान्य शिक्षणासह सैनिकी प्रशिक्षणाचीही आवश्यकता आहे. यामुळे आत्मविश्वासासह सातत्य, चारित्र्य, देशाभिमान आणि शिस्त सहजच निर्माण होते. विद्यार्थ्यांना इच्छित ध्येय गाठण्यासाठी सैनिकी शिस्त निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे मत एनसीसी ओटीए कामठीचे डेप्युटी कमांडन्ट ब्रिगेडिअर एस. बी. सिंग यांनी व्यक्त केले. कारगील विजयी दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.रविनगर येथील प्रहार मिलिटरी स्कूल आणि प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे कारगील विजय दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला ब्रि. सिंग यांच्या पत्नी इंदू सिंग, मेजर जनरल ए.एस. देव, प्रहार संस्थेचे अध्यक्ष कर्नल सुनील देशपांडे, कर्नल व्ही.एल. वडोदकर, रजत महाजन, प्रहार वासुदेवलीला शाळेच्या मुख्याध्यापिका दर्शना करजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. अमर जवानांना श्रद्धांजली व पुष्पचक्र अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शिस्तबद्ध बँड पथक आणि सैनिकी युनिफार्म परिधान करून उपस्थित झालेले विद्यार्थी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी पॉवर पार्इंट प्रेझेन्टेशनद्वारे कारगील युद्धातील कामगिरीमुळे परमवीर चक्र मिळविलेल्या जवानांची शौर्यगाथा सादर केली.विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करताना एस.बी. सिंग यांनी कारगील युद्धाच्या आठवणी सांगितल्या. भारताच्या सीमेत घुसून काश्मीरमध्ये उत्पात करण्याचा मनसुबा ठेवून पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी केली होती. मात्र भारतीय सैनिकांनी सर्वस्व पणाला लावून त्यांचे मनसुबे उधळून लावले. विद्यार्थ्यांनी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या क्षेत्राची करिअर म्हणून निवड करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. अमेरिकेसारखे देश आज शांतीची भाषा बोलत आहेत. मात्र भारत आधीपासूनच शांतीप्रिय देश असल्याचे सांगत ही शांती टिकवून ठेवण्यासाठी देशाचा सर्व क्षेत्राचा विकास होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन नवव्या वर्गातील खुशी सिरसाट हिने केले. शाळेच्या मुख्याध्यापिका शुभा मोहगावकर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)विजयाची किंमत रक्ताने चुकविलीया कार्यक्रमात चौथ्या वर्गाच्या त्रिशा पर्वते या मुलीचे भाषण रोमांच जागविणारे ठरले. कोणत्याही युद्धात विजयाची किंमत वीरांना आपल्या रक्ताने चुकवावी लागते. कारगील युद्धातही भारतीय जवानांनी आपल्या रक्ताने विजयाची किंमत चुकविली आहे. या युद्धात देशाचे ५०० वीर पुत्र शहीद झाले तर हजारो जखमी झाले होते. तेव्हा कुठे विजयाचा दिवस साजरा करण्याचे सौभाग्य लाभत आहे. त्यांच्या आठवणी नेहमीच जाग्या राहाव्या असे आवाहन तिने केले.
इच्छित ध्येय गाठण्यासाठी सैनिकी शिस्त आवश्यक
By admin | Published: July 26, 2016 2:22 AM