लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नायलॉन मांजात अडकलेल्या एका कोकीळ पक्ष्याची सुटका करण्यात आली. सक्करदरा विदर्भ बुनियादी कॉलेज परिसरातील निवासी अंबरीश सावरकर यांच्या घरासमोरील युवा पार्क मधील वडाच्या झाडावर अंदाजे ५० फूटपेक्षा अधिक उंचीवर नायलॉन मांजात मादी कोकिळा पक्षी मागील दोन तीन दिवसांपासून अडकलेली होती. ही माहिती आप युवा आघाडी विदर्भ रीजन अध्यक्ष पियुष आकरे यांना कळताच त्यांनी डब्लू. ओ.आर.आर. सी संस्थेच्या स्वप्निल बोधाने सोबत घटनास्थळ गाठले. पक्षी अडकलेल्या झाडाची ऊंची अधिक असल्यामुळे स्वप्निल बोधाने यांनी अग्निशामक दलाला संपर्क केला काही क्षणातच अग्निशामक दल घटनास्थळावर आले व मांजात अडकलेल्या त्या पक्ष्याला काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. परंतु प्रश्न होता झाडाच्या उंचीचा. म्हणून सिव्हिल लाइन येथील कार्यालयातून अग्निशामक दलाचे हायड्रोलिक वाहन पक्ष्याच्या सुटकेकरिता बोलावण्यात आले. या वाहनाच्या सहाय्याने लगेच कोकिळेला मांजाच्या तावडीतून सोडवण्यात आले. स्वप्निल बोधाने यांनी कोकिळेची चिकित्सा करून तिला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.