नागपूर : घरी कोणालाच काही न सांगता गुजरातमधील अहमदाबाद येथे गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने शोध घेऊन त्यांना सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.
हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या ३५ वर्षांच्या फिर्यादी यांनी त्यांची १६ वर्षाची अल्पवयीन मुलगी आणि शेजारी राहणारी तिची १७ वर्षाची अल्पवयीन मैत्रीण यांना कोणीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याची माहिती २८ ऑक्टोबरला हिंगणा पोलिसांना दिली होती. त्यानुसार हिंगणा पोलिसांनी कमल ३६३ नुसार गुन्हा दाखल केला होता; परंतु या अल्पवयीन मुली न मिळाल्याने हिंगणा पोलिसांसोबत याचा तपास गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाकडे देण्यात आला होता.
पथकाने तांत्रिक अभ्यास करून मुलींचा मोबाईल क्रमांक मिळविला. मुलींना विश्वासात घेऊन त्यांचे लोकेशन घेतले असता त्या गुजरातच्या अहमदाबाद येथे असल्याचे समजले. या मुली अहमदाबाद येथील वस्त्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तेथील स्थानिक पोलिसांना त्यांना ताब्यात घेण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर एक पथक अहमदाबादला पाठवून अल्पवयीन मुलींना सोमवारी ३१ ऑक्टोबरला नागपुरात आणण्यात येऊन हिंगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रोशन पंडित, सहायक पोलीस निरीक्षक गजानन चांभारे, अरुण बकाल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानेश्वर ढोके, मनीष पराये, सुनील वाकडे, शरीफ शेख, आरती चौहान यांनी केली.
....................