लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दैव बलवत्तर म्हणून गांधीसागर तलावात उडी घेतलेल्या व्यक्तीचा जीव वाचला. महापालिकेच्या अग्निशमन विभागातील जवानाने आपल्या जीवाची पर्वा न करता क्षणात तलावात उडी घेऊन त्याला बाहेर काढले. ही घटना गेल्या मंगळवारी सायंकाळी ४.२० वाजताच्या सुमारास घडली. जवानांच्या तत्परतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला. याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अग्निशमन विभागातील चालक यंत्र चालक विक्रम नारायण डोमे आणि प्रमुख अ्ग्निशामक विमोचक शंकर गणपत बिजवे हे मंगळवारी ड्युटी करून आपल्या घरी परत जात होते. त्यावेळी त्यांना गांधीसागर तलावात माणसाने उडी मारल्याचे निदर्शनास आले. डोमे यांनी क्षणाचाही विलंब न करता तलावात उडी घेऊन रवींद्र मधुकर महाले(५४) रा. नेहरू नगर यांना जिवंत बाहेर काढले.
प्रथमोपचार करून गणेशपेठ पोलिसांच्या मदतीने त्यांना मेयो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. आता महाले यांना किंग्जवे हॉस्पिटल येथे दाखल केले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. घटनास्थळी आकाश गजानन तिडके व नीलेश प्रभाकर तुरणकर,उपस्थित होते.