नागपूर :चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील आदिवासींमधील विविध रोगांवरील संशोधनासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ब्लॉसम’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात ‘लिव्हर अँड लाईफ स्टाईल्स डिसीज’वर अभ्यास केला जाणार आहे.
या संशोधन कार्याचा प्रारंभप्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त), लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, उपक्रमाचे समन्वयक डॉ. संजीव चौधरी, ट्रायबल हेल्थ रिसर्चर डॉ. दिलीप गोडे, आदी उपस्थित होते.
- दूर्गम भागात शिक्षण, संशोधन गरजेचे
कुलगुरू डॉ. कानिटकर यांनी सांगितले, आदिवासी समाजातील लोकांचे प्रश्न, आरोग्य विषयक समस्या जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठी ‘ब्लॉसम’च्या माध्यमातनू राज्यातील दुर्गम भागातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे. ‘ब्लॉसम’ नावात ब्रेस्ट कॅन्सर, लिव्हर डिसऑर्डर, ऑस्टिओपोरसिस, लैंगिक संबंधातून पसरणारे आजार, सिकलसेल, मुखाचे आजार आणि मालन्युट्रिशन, आदी आजारांच्या नावांचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून या आजारांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
- ‘ब्लॉसम’ उपक्रम विविध प्रकल्पांसाठी महत्त्वपूर्ण
डॉ. आमटे यांनी सांगितले की, ‘ब्लॉसम’ उपक्रमाच्या माध्यमातून मिळणारी माहिती संशोधन आणि विविध प्रकल्पांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आदिवासी भागातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून काम करणे कौतुकास्पद आहे.
- उपक्रम तीन टप्प्यांत कार्यान्वित
विद्यापीठाच्या ‘ब्लॉसम’ प्रकल्पाचे समन्वयक डॉ. चौधरी यांनी सांगितले की, ‘ब्लॉसम’ प्रकल्प तीन टप्प्यांमध्ये कार्यान्वित केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात स्क्रीनिंग, सोल्यूशन आणि नियोजन, दुसऱ्या टप्प्यात आदिवासी लोकसंख्येमध्ये विविध रोगांचे प्रमाण निश्चित करणे, तर तिसऱ्या टप्प्यात निष्कर्षांवर आधारित उपाययोजना केल्या जाणार आहे. हा प्रकल्प चंद्रपूर व गडचिरोली, देवरी व गोंदिया आणि रामटेक व पारशिवनी या भागातील प्रत्येकी सहा गावांमध्ये राबविला जाईल. जवळपास ८ ते १० हजार नागरिकांचा यात समावेश असेल.