योगेंद्र शंभरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील विषारी सापांच्या विषावर मुंबईच्या ‘हाफकिन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च व टेस्टींग लॅब’मध्ये संशोधन होणार आहे. यासाठी नागपूरसह आजूबाजूच्या तहसील वनक्षेत्रातून विषारी सापांना एकत्रित करण्याचे काम सुरू झाले आहे. येथील सापांचे विष किती प्रमाणित विषारी आहे, यावर संशोधन करून सर्पदंशाच्या उपचारासाठी प्रभावी असलेले ‘अॅन्टी व्हेनम’ औषध तयार करण्यात येणार आहे. यासाठी काही दिवसांपासून हाफकिन इन्स्टिट्यूटच्या चमूने नागपुरात आपल्या कार्यालयात सुरुवात केली आहे.वरिष्ठ वन अधिकाऱ्यानुसार, हाफकिन इन्स्टिट्यूटला अॅन्टी व्हेनम तयार करण्यासाठी शासनाची मान्यता आहे. यामुळे विषारी सर्पदंशाच्या रुग्णाच्या उपचारासाठी आवश्यक औषध तयार करण्यासाठी सापाचे विष एकत्रित करणे व संशोधनासाठी एका जिल्ह्यातील सापांना दुसऱ्या जिल्ह्यात वाहतूक करण्याचा परवाना वन विभागाद्वारे दिला जातो. सूत्रानुसार, संपूर्ण राज्यात हाफकिनला सापांना एकत्रित करण्याची परवानगी आहे. आतापर्यंत या संस्थेचे प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्र, सावंतवाडी, मराठवाडा भागातील सापांचे विष काढून अॅन्टी व्हेनम तयार करायचे. परंतु विविध विभागात सर्पदंशाच्या प्रकरणात अॅन्टी व्हेनम औषधांचा प्रभाव कमी-जास्त असतो. अनेक वेळा सर्पदंशाच्या रुग्णाला १० ते १२ अॅन्टी व्हेनमचे डोज द्यावे लागतात. अशास्थितीत प्रभावशाली अॅन्टी व्हेनम तयार करण्यासाठी जास्त विषारी प्रजातीचे साप आणि त्या भागाची माहिती असणे आवश्यक असते. यासाठी यावेळी विदर्भातील वनक्षेत्रात आढळून येणारे विषारी साप एकत्रित केले जात आहे. मागील दोन दिवसात हिंगणा आणि उमरेडमधून विषारी साप एकत्रित करण्यात आल्याची माहिती आहे.
विषारी साप सोबत नेणारसाप हा ‘शेड्यूल’ प्राणी आहे. यामुळे त्याचा पंचनामा केला जाईल. नागपूर वन विभागाच्यावतीने वाहतुकीचा परवाना दिला जाईल. त्यानंतर विषारी साप घेऊन टीम ७ सप्टेंबर रोजी मुंबईसाठी निघेल. यासाठी दोन सदस्यीय चमू प्रत्येक जिल्ह्यात काम करीत असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.
काही बोलण्यास दिला नकारनागपूरच्या सेमिनरी हिल्समध्ये पोहचलेल्या चमूतील सदस्यांनी या दौऱ्यासंबंधी काही बोलण्यास नकार दिला. यासंदर्भात हाफकिन इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. निशिगंधा नाईक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.