सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काचबिंदूमध्ये (ग्लॉकोमा) डोळ्यांतील दाब कमी करण्यासाठी आय ड्रॉप दिला जातो. परंतु, तो पातळ असल्याने लवकर बाहेर पडतोे. डोळ्यांत टिकून राहत नसल्याने त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. ते टिकावे म्हणून जेल दिले जाते. परंतु, अनेकांना डोळे चुरचुरण्याचा त्रास होतो. यावर नागपूरच्या दोन तज्ज्ञांनी संशोधन करून अनोखे ‘फॉर्म्युलेशन’ तयार केले. यात डोळ्यांत औषध टाकताना ते द्रव रूपात असते आणि नंतर ते जेलमध्ये रूपांतरित होते. या ‘फॉर्म्युलेशन’ला नुकतेच पेटंट मिळाले. याची मानवी चाचणी यशस्वी झाल्यास काचबिंदू उपचारात मोठा फायदा होऊ शकतो, असे नेत्ररोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गुरू नानक कॉलेज ऑफ फार्मसीच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. मिथाली बोधनकर व त्यांचे विद्यार्थी असलेले फार्मा कोविजिलन्स असोसिएट गजानन पानपत्ते यांनी या नव्या ‘फॉर्म्युलेशन’चा शोध लावला आहे. त्यांच्या या संशोधनाला डिसेंबर २०२० मध्ये ‘पेटंट’ मिळाले.
ग्लॉकोमा हा डोळ्यांच्या आजारांचा समूह आहे. कुठलेही लक्षणे न दिसता दृष्टी हिरावून घेण्यास तो कारणीभूत ठरतो. डोळ्यांच्या तंतूंना इजा पोहोचून दृष्टी जाते व ‘इन्ट्रॉक्यूलर प्रेशर’ चा परिणाम होतो. या मज्जातंतूचे कार्य लाखो तार जुळलेल्या विद्युत केबलप्रमाणे असते. ते डोळ्यांमधून मेंदूमार्फत प्रतिमा तयार करण्यास कारणीभूत असतात. अनेकदा अॅडव्हान्स स्टेजपर्यंत पोहोचल्याशिवाय ग्लॉकोमाचे निदानही होत नाही. देशात १२ लाख लोक या आजाराने ग्रस्त आहेत. त्यातील जवळपास १.२ लाख लोकांनी दृष्टी गमावली आहे. यामुळे यावरील हे संशोधन महत्त्वाचे मानले जात आहे.
- प्राण्यांवर केलेल्या चाचणीचे चांगले रिझल्ट- डॉ. बोधनकर
‘लोकमत’शी बोलताना डॉ. बोधनकर म्हणाल्या, २०१४ मध्ये या ‘फॉर्म्युलेशन’ला पेटंटकरिता सादर केले. त्याच्या पाच-सहा वर्षांपूर्वीपासून संशोधन सुरू होते. हे फॉर्म्युलेशन दोन औषधी मिळून तयार केले आहे. डोळ्यांत टाकताना हे औषधी द्रव रूपात असते आणि डोळ्यांत गेल्यावर त्याचे जेल होते. यामुळे डोळ्यांत हे औषधी जास्त वेळ टिकून राहते. वाहून जात नाही. यामुळे उपचारात मदत होते. औषधी कमी लागतात. या ‘फॉर्म्युलेशन’ची प्राण्यांवर चाचणी झाली आहे. त्याचे चांगले ‘रिझल्ट’ आले आहेत. आता पेटंट मिळाल्याने लवकरच मानवी चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर ही औषधी बाजारात आणली जाईल.
-तर ग्लॉकोमावरील उपचारात मोठी मदत - डॉ. मदान
वरिष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ व मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे माजी प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी सांगितले, जसा रक्तदाब असतो, तसाच डोळ्यातील द्रवाचाही दाब असतो. त्याचा परिणाम ‘ऑप्टिक नर्व्ह’वर होतो आणि मग दृष्टी गमवावी लागू शकते. विशिष्ट औषध टाकून आहे ती दृष्टी वाचविणे, मग शस्त्रक्रिया करणे हाच काचबिंदूवरील उपाय आहे. डोळ्यांत टाकण्यात येणाऱ्या औषधामुळे दाब नियंत्रित राहतो व वाहिन्यांची हानी होत नाही. परंतु, औषधी पातळ असल्याने ते लवकर वाहून जाते. ते टिकून राहण्यासाठी व त्याचा प्रभावीपणे उपयोग होण्यासाठी तयार करण्यात आलेले हे ‘फॉर्म्युलेशन’ ग्लॉकोमावरील उपचारात मोठी मदत होऊ शकेल. परंतु, मानवी चाचणी केल्यानंतरच त्याची सिद्धता स्पष्ट होईल.