लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघ व देशातील इतर ओबीसी संघटनांनी पुकारलेले आंदोलन व पाठपुरावा यामुळेच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात ऑल इंडिया कोटाअंतर्गत ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळाले, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने यासंदर्भातील निर्णय घेतला असून, तसे नोटिफिकेशन सुद्धा जारी करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात ओबीसींना आरक्षण मिळावे, यासाठी ऑल इंडिया कोटाअंतर्गत आरक्षण लागू करण्याची मागणी फार जुनी आहे. देशभरातील ओबीसी संघटना यासाठी आंदोलन करीत होते. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सुद्धा ही मागणी लावून धरली होती. यासाठी अनेकदा आंदोलने केली. सातत्याने पाठपुरावा सुद्धा केला. अखेर केंद्र सरकारने ओबीसी संघटनांच्या आंदाेलनाची दखल घेतली आणि ‘नीट’मध्ये २०२०-२१ या वर्षांपासून ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू केले.