नागपूर : महाराष्ट्रात ओबीसींची खरी फसवणूक देवेंद्र फडणवीस यांनीच केली. आरक्षण पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांच्यामुळेच गेले, असे शरसंधान ओबीसींचे अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी साधले.
महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात शनिवारी झालेल्या प्रबोधन शिबिरात ते बोलत होते. मुख्य वक्ते ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे आणि ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे होते. प्रा. हरी नरके यांनी ओबीसी आरक्षण आणि ओबीसी जनगणनेचा मुद्दा सविस्तर मांडला. ओबीसींचे आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत, याचे विवेचन केले. राष्ट्रनिर्मिती आणि सामाजिक न्याय यांवर रावसाहेब कसबे म्हणाले, सद्य:स्थितीत देश हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे. ओबीसी म्हणणारे केंद्रीय नेतृत्वच ओबीसीला संपवायला निघाले आहे. सामान्य माणूस खडतर स्थितीतून जात असल्याने ओबीसी नेतृत्वाची गरज त्यांनी व्यक्त केली.
उत्तम कांबळे यांनी सामाजिक न्यायामध्ये महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची सोदाहरण मांडणी केली. केवळ आरक्षण देऊन चालणार नाही. देशाची संपत्ती व अधिकारांचे समान वाटप होण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. आम्ही ५२ टक्के आहोत, या भ्रमात राहू नका. यासाठी आतून आणि बाहेरून लढाई लढावी लागणार आहे.
प्रारंभी परिषदेचे प्रास्ताविक महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा. दिवाकर गमे यांनी केले. कार्याध्यक्ष बापू भुजबळ, राष्ट्रवादी काॅंंग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, मनोज गणोरकर, मिलिंद पाचपोर, अरुण पवार, दत्ता खरात, निळकंठ पिसे, आरिफ काजी, डाॅ. अनिल ठाकरे, बापू चरडे, कविता मुंगळे, विद्या बहेकर, राहुल निर्वाण, नफिस शेख, विजय लोनबले, निशा मुंडे, रेखा कृपाले, वंदना वनकर, आदींसह समता परिषद, ओबीसी सेल व विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी व ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.
...
संघभूमीतून नरके यांनी संघावर डागली तोफ
रेशीमबाग परिसरातील सभागृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमीतून प्रा. हरी नरके यांनी पत्रकार परिषदेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोफ डागली. अलीकडे दत्तात्रय होसबळे यांची आरक्षणासंदर्भात आलेल्या सकारात्मक प्रतिक्रियेची चिरफाड करताना ते म्हणाले, संघाची आरक्षणासंदर्भात भूमिका बदलली, असे या प्रतिक्रियेवरून समजण्याचे कारण नाही; कारण संघाचा ९६ वर्षांचा प्रवासच आरक्षणमुक्त भारताचा आणि सामाजिक न्यायाच्या विरोधातील आहे. मंडल आयोगाच्या वेळी कमंडलू यात्रा काढणारे कोण होते हे सर्वांना माहीत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ फेररचनेदरम्यान मंत्र्यांचा परिचय करून देताना मोदी यांना अचानकपणे आलेला ओबीसी खासदारांचा कळवळा हासुद्धा दिखाऊपणा आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत फडणवीसांनी दिशाभूल केली. त्यांच्या खोटारडेपणाचे २७ पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला.
...