सावनेर/हिवराबाजार : सावनेर तालुक्यातील ७५ आणि रामटेक तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सावनेर तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण मंगळवारी (दि. ८) व रामटेक तालुक्यातील आरक्षण साेडत बुधवारी (दि. ९) काढली जाणार असल्याने, इच्छुकांसह नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहाेचली आहे.
आरक्षण साेडत जाहीर करण्यासाठी सावनेर तहसील कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी विशेष सभेचे आयाेजन केले आहे. यात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर केले जाईल. या सभेला ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य व काही नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी दिली.
रामटेक तालुक्यात एकूण ४८ ग्रामपंचायती असून, यातील काही ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्याने त्या गावांमध्ये निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण साेडत रामटेक शहरातील स्व. घनश्यामराव किंमतकर सभागृहात बुधवारी काढली जाणार असून, कार्यक्रमाला सकाळी ११ वाजतापासून सुरुवात हाेणार आहे, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली. या दाेन्ही ठिकाणी काेराेना संक्रमण राेखण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययाेजनांचे पालन केले जाणार असल्याचेही प्रताप वाघमारे व बाळासाहेब मस्के यांनी स्पष्ट केले.