सोपान पांढरीपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाल्यानंतर शक्तिकांत दास यांनी तीन मौद्रिक धोरणे दिली आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक धोरणात रेपो रेट पाव टक्क्याने कमी केला. गेल्या सहा महिन्यात रेपो रेट ६.५० टक्क्यावरून ५.७५ टक्क्यावर आला तरी सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढीचा दर सतत कमी होतो आहे आणि हीच हतबलता शक्तिकांत दास यांच्या आजच्या मौद्रिक धोरणातूनही झळकते आहे.आपल्या वक्तव्यामध्ये शक्तिकांत दास यांनी अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे जागतिक व्यापार प्रभावित झाल्याचे व कच्च्या तेलाच्या किमती अस्थिर झाल्याने जीडीपीचा दर कमी झाला असून महागाई वाढल्याचे मान्य केले. चालू वर्षासाठी (२०१९-२०) जीडीपीचा दर ७.२० टक्क्याऐवजी ७ टक्क्याने वाढेल व महागाईचा दर २.९० टक्क्यावरून ३.३० टक्क्यांवर वाढणार असल्याचे भाकीत केले आहे.पायाभूत क्षेत्राच्या सिमेंट, पोलाद, वीज निर्मिती, कोळसा, खनिज उत्पादन व कृषी उत्पादन अशा आठही उद्योगात मंदी आली आहे. ती दूर करण्यासाठी बाजारात भांडवल तरलता (लिक्विडिटी) वाढवणे आवश्यक आहे. पण तरलतेसाठी काय उपाययोजना करायची हे ठरविण्यासाठी एक समिती नेमून शक्तिकांत दास मोकळे झाले. रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात समिती नेमण्याचा हा प्रकार प्रथमच घडला आहे.बँकांचे ९ लाख कोटी थकीत कर्ज वसुलीसाठी या आठवड्यात नवीन परिपत्रक काढू असेही दास यांनी जाहीर केले. नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज (एनबीएफसी) व दिवाण हाऊसिंग फायनान्ससारख्या कंपन्या कर्ज सापळ्यात अडकल्या आहेत. त्याबाबतही मौद्रिक धोरण गप्प आहे.एवढेच नव्हे तर एनबीएफसीजचे नियंत्रण सेबीकडे आहे व गृहकर्ज कंपन्यांचे नियंत्रण नॅशनल हाऊसिंग बँक करते, रिझर्व्ह बँक करते असा कातडी वाचवणारा युक्तिवादही या मौद्रिक धोरणात प्रथमच दिसला. मजेची बाब म्हणजे गेल्या सहा महिन्यात रेपो रेटमध्ये ०.७५ टक्क्यांची घट झाली असली तरी बँकांनी मात्र व्याजाचे दर फक्त ०.२१ टक्क्यांनी घटवले आहेत. त्यामुळे बँका रिझर्व्ह बँकेचे धोरण पाळत नाहीत हे दास यांनीच मान्य केले आहे.रिझर्व्ह बँकेची ही हतबलता नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा ‘निफ्टी’ व मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स यांच्या गडगडण्यातूनही दिसते आहे. गेल्या दहा दिवसांपासून ४०,००० च्या आसपास असणारा सेन्सेक्स, मौद्रिक धोरण जाहीर झाल्यावर एक तासातच ५५३ अंकांनी व निफ्टी १७६ अंकांनी घसरला व अनुक्रमे ३९५२९.७२ वर व ११८४४.७० अंकावर बंद झाला.
मौद्रिक धोरणातून झळकली रिझर्व्ह बँकेची हतबलता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 10:11 AM