नागपूर : कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत कार्य करणाऱ्या कर्मचारी, शिक्षकांना कोरोना संक्रमणाची शक्यता अधिक असून, असे कर्मचारी-शिक्षक यांच्याकरिता सर्व शासकीय व खासगी दवाखान्यात किमान १५ टक्के खाटा राखीव ठेवण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने नागपूर विभागीय आयुक्त तसेच नागपूर जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सुरू असलेल्या कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर यांच्या सेवा संलग्न करण्यात आलेल्या आहेत. हे सर्व कर्मचारी लोकांच्या सतत संपर्कात असल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना संक्रमणाचा धोका अधिक आहे. जिल्ह्यात कोरोना उपचाराकरिता आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून, सध्या व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड सहजतेने उपलब्ध होत नाही. कोरोना मोहिमेत काम करणाऱ्या कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व आशावर्कर यांना अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाचे संक्रमण झाल्यास त्वरित आरोग्य सुविधा, दवाखान्यात खाटा उपलब्ध होणे गरजेचे आहे. परंतु अनेक वेळा तातडीने आरोग्य सुविधा अथवा दवाखान्यात खाटा उपलब्ध होत नाही. त्यामुळे कोरोना नियंत्रण मोहिमेत कार्यरत कर्मचारी-शिक्षक, अंगणवाडी सेविका व आशावर्कर अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सर्व शासकीय व खासगी दवाखान्यात किमान १५ टक्के खाटा राखीव ठेवण्यात याव्यात, अशी मागणी समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस अनिल नासरे यांच्यासह दीपक उमक, अनिल देशभ्रतार, खेमराज माले, अशोक तोंडे, कमलाकर काळे, राजेश बांते, विजय जाधव, अनिल वाकडे, अनिल श्रीगिरीवार, विश्वास पांडे, योगेश राऊत, रामभाऊ धर्मे, अनिल हुमणे, अरविंद डांगे, प्रल्हाद चुटे, जयंत निंबाळकर, जयसिंग साबळे आदींनी केली आहे.