नागपूरच्या बहुचर्चित सेव्हन हिल्स बार लाईव्ह मर्डर खटल्यावर निर्णय राखून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 08:36 PM2018-04-19T20:36:40+5:302018-04-19T20:36:51+5:30
शहरात खळबळ माजविणाऱ्या सेव्हन हिल्स बार लाईव्ह मर्डरमधील सर्व सहा आरोपींनी जन्मठेप व अन्य शिक्षेविरुद्ध दाखल केलेल्या अपील्सवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी निर्णय राखून ठेवला. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष प्रकरणावर अंतिम सुनावणी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात खळबळ माजविणाऱ्या सेव्हन हिल्स बार लाईव्ह मर्डरमधील सर्व सहा आरोपींनी जन्मठेप व अन्य शिक्षेविरुद्ध दाखल केलेल्या अपील्सवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी निर्णय राखून ठेवला. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष प्रकरणावर अंतिम सुनावणी झाली.
तुषार साहेबराव दलाल (रा. दत्तात्रयनगर), अमोल महादेवराव मंडाळे (रा. भांडे प्लॉट), भूपेश ऊर्फ रिंकू विठ्ठलराव टिचकुले (रा. श्याम पॅलेस, काँग्रेसनगर), कुणाल मोतीराम मस्के (रा. गंगाबाई घाट, कॉर्पोरेशन कॉलनी), लक्ष्मीकांत ऊर्फ लच्छू रवींद्र फाये (रा. भुतिया दरवाजा, महाल) व समीर सुरेश काटकर (रा. न्यू सोमवारीपेठ क्वॉर्टर) अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी तुषार दलाल मुख्य आरोपी आहे. त्यांना ५ मे २०१५ रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. डब्ल्यू. चांदवानी यांनी भादंविच्या कलम ३०२ (खून) अंतर्गत जन्मठेप व अन्य विविध प्रकारची शिक्षा सुनावली आहे. त्याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील्स दाखल केले आहेत. जितू ऊर्फ जितेंद्र मारोतराव गावंडे (रा. भगवाननगर, अजनी) असे मयताचे नाव असून तो प्रॉपर्टी डिलर होता. ही घटना १० जानेवारी २०१३ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली होती.आरोपींच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी, अॅड. राजेंद्र डागा, अॅड. आर. के. तिवारी, अॅड. उदय डबले व अॅड. अद्वैत मनोहर तर, सरकारतर्फे अॅड. एम. जे. खान यांनी बाजू मांडली.
अशी घडली घटना
दलालने जितूकडून ५० हजार रुपये उसने घेऊन ही रक्कम पाच दिवसांत परत करण्याची हमी दिली होती. त्यानंतर तो रक्कम देण्यासाठी सतत टाळाटाळ करायला लागला. रक्कम परत न करता धमक्या द्यायला लागला. घटनेच्या दिवशी दलालने जितूला भांडे प्लॉट येथील सेव्हन हिल्स बार अॅण्ड रेस्टॉरेन्टमध्ये बोलावले. तेथे दलाल व मस्के यांनी जितूवर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. अन्य आरोपी घेराव करून उभे होते. आरोपींनी जितूच्या देहाची अक्षरश: चाळण केली होती.