लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर बसपात फेरबदल करण्यात आला आहे. बसपाच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप मेश्राम यांची तर शहराध्यक्ष म्हणून नितीन नागदेवते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु या नियुक्तीमुळे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.बहुजन समाज पार्टी नागपूर झोनमधील सातही जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या आढाव्यानंतर पक्षाचे प्रदेश प्रभारी आ. राम अचल राजभर, राज्याचे प्रभारी तथा नागपूर झोन इन्चार्ज प्रमोद रैना, प्रदेश प्रभारी अॅड. संदीप ताजने, प्रदेश प्रभारी कृष्णा बेले, प्रदेश महासचिव मंगेश ठाकरे, प्रदेश सचिव भाऊसाहेब गोंडाणे, प्रदेश सचिव रूपेश बागेश्वर यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु याबाबत पक्षाचे अधिकृत पत्र जारी करण्यात आलेले नाही. यासंदर्भात रुपेश बागेश्वर आणि भाऊ गोंडाणे यांना विचारणा केली असता त्यांनी ही नियुक्ती करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. पदाधिकाऱ्यांनी ही नियुक्ती केली असली तरी, या नियुक्तीमुळे बसपाच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.लोकसभा निवडणुकीत बसपाची कामगिरी यंदा अतिशय निराशाजनक राहिली. स्वत: उमेदवारानेच पक्षविरोधी कार्य केले म्हणून पक्षातून काढण्यात आले तर उमेदवाराने पदाधिकाऱ्यांवरच पक्षविरोधी कार्य केल्याचा आरोप केला. यामुळे सामान्य कार्यकर्ता प्रचंड दुखावलेला आहे. पक्षांतर्गत असलेली ही धुसफूस अजूनही थांबलेली दिसत नाही. १० तारखेला झालेल्या आढावा बैठकीतही पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या फेरबदलामुळे कार्यकर्त्यांची नाराजी आणखीनच वाढली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची ओळख काय? ते कोणत्या कमिटीवर कार्यरत होते, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. बसपाचे शहराध्यक्ष प्रकाश गजभिये व जिल्हाध्यक्ष विलास सोमकुंवर यांना याबाबत विचारणा केली असता आम्हाला काहीही माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. अशी नियुक्ती होत नाही. प्रदेशाध्यक्षाचे अधिकृत पत्र लागते. आम्हालाही याबाबत कळविण्यात आले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. एकूणच बसपामधील नाराजी या नियुक्तीनंतर वाढण्याची शक्यता बळावली आहे.
बसपात फेरबदल, कार्यकर्त्यांत असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:07 AM
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर बसपात फेरबदल करण्यात आला आहे. बसपाच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप मेश्राम यांची तर शहराध्यक्ष म्हणून नितीन नागदेवते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु या नियुक्तीमुळे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
ठळक मुद्देजिल्हाध्यक्ष - शहराध्यक्ष बदललेसंदीप मेश्राम यांची जिल्हाध्यक्ष तर नितीन नागदेवते शहराध्यक्षपदी नियुक्ती