नागपूर : वेळेत न मिळणारे विद्यावेतन, वसितगृहांची अपुरी सोय, या दोन मुख्य मागणीसाठी निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ आक्रमक झाली आहे. बुधवार, ७ फेब्रुवारीपासून सामूहिक रजा किंवा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. असे झाल्यास नागपुरातील इंदरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दर महिन्याला १० तारखेच्या आत विद्यावेतन मिळण्यासह वसतिगृहाची पुरेशी सोय उभी करण्यासाठी ‘सेंट्रल मार्ड’ने २०२३ मध्ये संप पुकारला होता. त्यावेळी शासनाकडून वेळेत विद्यावेतन व वसितगृहाची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पुढे काहीच झाले नाही. मागील महिन्यात पुन्हा वैद्यकीय शिक्षण विभागासोबत बैठक झाली. ‘मार्ड’ने आपल्या मागण्या रेटून धरल्या. मात्र, आश्वासनापलिकडे पदरी काहीच पडत नसल्याचे पाहत, अखेर ‘सेंट्रल मार्ड’ने बुधवारपासून संपाचे हत्यार उपसले, अशी माहिती मेयो ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. बालगंगाधर दिवेदी यांनी ‘लोकमत’ला दिली.
दोन महिन्यापासून विद्यावेतन नाही
मेयो व इतरही मेडिकलमध्ये वेळेत विद्यावेतन मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. मेयोमध्ये मागील दोन महिन्यापासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा (पीजी) विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळाले नाही. दर महिन्याला १० तारखेचा आत विद्यावेतन मिळण्याची मागणी आहे. परंतु शासन गंभीरतेने घेत नाही. विद्यावेतन वेळेत मिळत नसल्याने निवासी डॉक्टरांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे डॉ. द्विवेदी म्हणाले.
‘पीजी’च्या जागा वाढल्या परंतु वसतिगृह नाहीत
राज्यातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या जागा वाढल्या, परंतु ्रतातडीने वसितगृहाची सोय उभी झाली नाही. आता कुठे अनेक ठिकाणी वसतिगृहाचे भूमिपूजन के ले जात आहे तर, काही ठिकाणी वसतिगृहाचे बांधकाम सुरू झाले आहेत. ते पूर्ण व्हायला दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत विद्यार्थी कुठे राहणार, हा प्रश्न आहे. एका खोलीत तीन पेक्षा जास्त विद्यार्थी राहत असल्याने तर काहींना महाविद्यालयाबाहेर राहण्यास सांगितले जात असल्याने संताप व्यक्त केला जात असल्याचेही डॉ. द्विवेदी म्हणाले.