नागपूर : यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस अंतिम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या डॉ. अशोक पाल यांच्या हत्येच्या निषेधात व त्याला घेऊन रेटलेल्या विविध मागण्यांसाठी मेयो, मेडिकलमधील निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संप शनिवारी रात्री १ वाजेच्या सुमारास मागे घेण्यात आला. या संपात इन्टर्न डॉक्टरही सहभागी झाले होते.
डॉ. पाल यांच्या हत्येतील आरोपीला तत्काळ अटक करा, डॉ. पाल यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून ५० लाखांची आर्थिक मदत जाहीर करा, रुग्णालयात सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करा, रुग्णांसोबत केवळ एकाच नातेवाइकाला परवानगी द्या, आदी मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने शनिवारी सकाळपासून संप पुकारला.
मेयो, मेडिकलमधील निवासी डॉक्टरांच्या या संपाला इन्टर्न डॉक्टरांच्या संघटनेने पाठिंबा दिला होता. यामुळे दोन्ही रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित झाली होती. संपामुळे या दोन्ही रुग्णालयांतील डॉक्टरांची हिवाळी सुटी रद्द करण्यात आली; परंतु शनिवारी हत्येतील आरोपींना अटक करण्यात आल्याने व वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी यवतमाळ मेडिकलला भेट देत सुरक्षेचे आश्वासन दिले. यामुळे मेयो, मेडिकलच्या मार्ड पदाधिकाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. रविवारी सर्व निवासी डॉक्टर आपापल्या कामावर परतले. संप मिटल्याने दोन्ही रुग्णालयांतील रुग्णांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
आजपासून परिचारिका संपावर
अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेत ११ रुग्णांच्या मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार धरून एका परिचारिकेवर निलंबनाची, तर दोन परिचारिकांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली. याचा निषेध म्हणून राज्य परिचारिका संघटनेने सोमवार, १५ नोव्हेंबरपासून संपाचा इशारा दिला आहे. यासंदर्भाचे पत्र संघटनेच्या वतीने अधिष्ठातांना देण्यात आले आहे. परिचारिका संपावर जाणार असल्याने दोन्ही रुग्णालयांनी नर्सिंग विद्यार्थी व आरोग्य विभागातील परिचारिकांची मदत घेतल्याचे समजते.