नागपूर : जनतेच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे त्या सोडविण्याचा वेळ नाही. हुडकेश्वर भागातील दुबेनगरातील लोकांना ९ महिन्यानंतर पाण्याचे बिल आले. त्या बिलाची रक्कम १० ते १५ हजाराच्या जवळपास आहे. ९ महिन्यानंतर आलेल्या पाणी बिलामुळे दुबेनगरवासी हैराण झाले असून, आलेल्या अवाढव्य बिलाच्या तक्रारी जलप्रदाय विभागाकडे करीत आहे. पण त्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ नसल्याची खंत ते व्यक्त करीत आहे.
९ महिन्यापूर्वीपर्यंत दुबेनगरातील लोकांना दर तीन महिन्याचे पाण्याचे बिल यायचे हे बिल २५० ते ३०० रुपयांच्या आसपास होते. पण ९ महिन्यानंतर आलेले बिल हे १० ते १५ हजाराच्या जवळपास आले आहे. दुबेनगर येथील प्लॉट नंबर १५ येथे राहणारे चंद्रकांत लोणारे यांना १३ एप्रिल २०२३ रोजी पाण्याचे बिल आले. त्यांना ९ महिन्याचे बील १४००३ हजार रुपये पाठविण्यात आले. सेवानिवृत्त असलेले लोणारेंना बिलाची रक्कम बघून धक्काच बसला. याआधी त्यांना दर तीन महिन्यांनी नळाचे बिल यायचे तेही २५० ते ३०० रुपये. पण ९ महिन्याची ही रक्कम १४००३ रुपये कशी आली, हे अनाकलनीय आहे. पाण्याचे बिल कमी करून द्यावे, यासाठी त्यांनी जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या नावाने विनंती अर्ज केला आहे.
स्थानिक झोनमध्येही त्यांनी तक्रार दिली आहे. हे बिल वर्षातून एकदाच अंदाजे मीटर रिडींग घेऊन पाठविले आहे. नळाचे मीटर रिडींग घ्यायला वर्षभर कोणीच आले नाही. दुबे नगरातील रहिवाश्यांच्या स्थानिक झोनकडे पाण्याच्या बिलासंदर्भातील तक्रारी वाढल्या आहेत. झोनच्या जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की वीज बिलाच्या वितरणाचे काम एजन्सीला दिले होते. त्या एजन्सीने दोन वर्षापासून बिल काढले नाही. त्यामुळे आता बिल पाठविण्यात येत आहे.