उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव यांचा भर कोर्टात राजीनामा, संपूर्ण दिवसाचं कामकाज केलं रद्द
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: August 4, 2023 01:38 PM2023-08-04T13:38:06+5:302023-08-04T13:39:33+5:30
संपूर्ण दिवसाचे कामकाज रद्द करीत असल्याचे सांगून स्वत:च्या कक्षात निघून गेले
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती रोहित देव यांनी शुक्रवारी पदाचा राजीनामा दिला. त्यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
न्या. देव नागपूरकर असून त्यांची ५ जून २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्यात आली होती. दोन वर्षाच्या सेवेनंतर त्यांना न्यायमूर्ती पदी कायम करण्यात आले होते. त्यांनी शुक्रवारी न्यायालयात आल्यानंतर त्यावेळी उपस्थित असलेल्या वकिलांना पदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. दरम्यान, त्यांनी भावनिक होऊन आपले मन मोकळे करताना आपण सर्व एक परिवार आहोत आणि परिवाराचा विकास व्हावा हाच आपला नेहमी उद्देश होता, असे वकिलांना सांगितले. तसेच, सर्वांना चांगले काम करीत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर ते संपूर्ण दिवसाचे कामकाज रद्द करीत असल्याचे सांगून स्वत:च्या कक्षात निघून गेले.
न्या. देव यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होण्यापूर्वी राज्याचे महाधिवक्ता व केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून १९८६ मध्ये एलएल. बी. पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे कार्य केले. १९९० पासून त्यांनी स्वतत्रपणे वकिली व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी ३० वर्षांच्या वकिली व्यवसायात विविध प्रकारची प्रकरणे हाताळली होती.