लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारने नुकत्याच आणलेल्या नव्या मोटार वाहन विधेयकाच्या विरोधात विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनतर्फे मंगळवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आॅटोचालकांनी नारे-निदर्शने करीत आंदोलन केले. फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांच्या नेतृत्वात मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांना देण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटओ) नागपूर शहरसमोर दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेकडो आॅटोचालकांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या विरोधात नारे-निदर्शने केली. यावेळी भालेकर म्हणाले, केंद्राच्या होऊ घातलेला नवा मोटार वाहन कायदा हा आॅटोरिक्षा व्यवसायाच्या विरोधात आहे. हा कायदा रद्द करण्यात यावा ही आमची मागणी आहे. आॅटोरिक्षा चालकांच्या जीवावर उठलेले ओला, उबर व ई-रिक्षा बंद करण्याचीही आमची मागणी आहे. या शिवाय, वाढलेल्या विम्याचे दर कमी करण्याची, नागपूर रेल्वे स्थानकावर ओला कॅबचे पार्किंग रद्द करण्याची व नागपुरात सुरू असलेली बेकायदेशीर वाहतूक बंद करण्याची मागणी आहे. या मागण्याचे निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आदे यांना देण्यात आले. त्यांच्या मार्फत पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री, परिवहन मंत्री यांच्यापर्यंत पोहचविले जाणार आहे. फेडरेशनच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही भालेकर यांनी दिला.शिष्टमंडळात फेडरेशनचे महासचिव आनंद चौरे, कार्याध्यक्ष रवी तेलरांधे, टायगर आॅटोरिक्षा संघटनेचे जावेद शेख, सचिव प्रकाश साखरे, किशोर सोमकुंवर, किशोर बंबोले, रवी सुखदेवे, देवीदास महल्ले, आसीफ भाई, किशोर इलमकर, आनंद मानकर आदी उपस्थित होते.
नव्या मोटार वाहन विधेयकाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:44 AM
केंद्र सरकारने नुकत्याच आणलेल्या नव्या मोटार वाहन विधेयकाच्या विरोधात विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनतर्फे मंगळवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आॅटोचालकांनी नारे-निदर्शने करीत आंदोलन केले. फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांच्या नेतृत्वात मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांना देण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
ठळक मुद्देआॅटोचालकांनी केली निदर्शने : विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशन